सुमित घरत/ भिवंडी
कोरोनापूर्वी भिवंडी-बोरिवलीदरम्यान सातत्याने धावणारी एसटी बससेवा सहा वर्षांपासून बंद असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहतूककोंडी, महामार्गावरील दुरुस्तीची कामे आणि मेट्रो प्रकल्पांमुळे बससेवा प्रभावित झाली असली तरी आता प्रवाशांची संख्या वाढत असल्याने ही सेवा तातडीने पुन्हा सुरू करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
भिवंडी आगारातून पहाटे ४ ते रात्री १० या वेळेत १५ बस फेऱ्या नियमित धावत असत. हजारो प्रवाशांसाठी ही बससेवा स्वस्त, सोयीची आणि सुरक्षित पर्याय होती. मात्र सेवा बंद झाल्यानंतर रिक्षाचालक ३०० ते ५०० रुपये आकारून प्रवाशांना बोरिवलीपर्यंत पोहोचवू लागले, अनेकांनी ओला-उबेर टॅक्सीचा आधार घेतला. तर काहींना दिवा-वसई मार्गे किंवा वसई बसने मोठा फेरा मारावा लागतो. दररोजच्या प्रवासासाठी हा महागडा आणि त्रासदायक पर्याय ठरत असल्याने प्रवासी महामंडळाबद्दल संताप व्यक्त करत आहेत. भिवंडी बस आगाराची इमारत दुरुस्तीअभावी धोकादायक झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना बस पकडण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्यामुळे भिवंडी-बोरिवली बस छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू करावी. या चौकातून आधीच ठाणे, कल्याण, मुलुंड सिटी बसेस जात असल्याने हा थांबा सर्वात सोयीस्कर ठरेल, असे प्रवाशांचे मत आहे.
सहा वर्षांनंतरही बससेवा का नाही?
वाहतूककोंडीमुळे बससेवा वेळेत पोहोचत नसल्याने प्रवासी कमी झाले आणि अखेर ही सेवा पूर्णतः थांबवण्यात आली. मात्र आता मुंबई-ठाणे मार्गे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून त्यामुळे सिटी बसेसचा ताण वाढत आहे. अशावेळी भिवंडी-बोरिवली थेट सेवा मिळावी, अशी अपेक्षा वाढू लागली आहे.