भिवंडी : बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी खोदकाम केलेल्या खड्ड्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कोपर गाव येथे सोमवारी सायंकाळी घडली आहे. या दुर्घटनेत देवव्रत जुगेश पांडेचा मृत्यू झाला आहे. या पीडित परिवाराच्या कुटुंबीयांचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भेट देत सांत्वन केले. यावेळी पीडित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीर उभे असून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देऊ, असे आश्वास दिले.
कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर खासदार बाळ्या मामा यांनी स्वतः दुर्घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर नारपोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दूरध्वनीवरून संपर्क साधून दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कंपनी प्रशासनावर योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे दुर्घटना घडल्यानंतर एल. अँड. टी. कंपनीने खड्डा असलेल्या ठिकाणी बॅरिकेट व धोक्याची सूचना देणारे बॅनर लावले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे तालुक्यातील काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी पिलर उभे करण्यासाठी खड्डे खोदले जात आहेत.
कोपर गावाच्या हद्दीत अशाच एका खड्ड्यात पाणी साचले असताना देवव्रत जुगेश पांडे हा चौथीमध्ये शिक्षण घेणारा चिमुरडा छोटा भाऊ व मित्रांसोबत शिकवणीनंतर घरी येत असताना खड्ड्यात साचलेल्या पाण्यात उतरला. त्याला खड्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूस एल. अँड टी कंपनीचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून दुर्घटना घडल्याच्या दिवशी खड्ड्याला कोणत्याही प्रकारचे संरक्षण नव्हते. मात्र दुर्घटना झाल्यानंतर कंपनीने या ठिकाणी बॅरिगेट लावले होते. त्यामुळे कंपनीचा हलगर्जीपणा व चतुराई दोन्ही चव्हाट्यावर आली असून या घटनेस जबाबदार असलेल्या कंपनी प्रशासनावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचे आश्वासन देत यासंदर्भात आपण पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती यावेळी खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.