ठाणे

Bhiwandi : महापौर निवडणुकीला वेगळे वळण; भाजपने उमेदवार बदलला; नारायण चौधरी सेक्युलर आघाडीकडे

भारतीय जनता पार्टीकडून भिवंडी महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच पक्षाने आपला अधिकृत उमेदवार बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Swapnil S

सुमित घरत /भिवंडी

भारतीय जनता पार्टीकडून भिवंडी महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच पक्षाने आपला अधिकृत उमेदवार बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष रविकांत (रवी) सावंत यांना पत्र देऊन नारायण चौधरी यांना महापौर पदासाठी भाजपचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले होते. त्यानुसार नारायण चौधरी यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता.

मात्र बुधवारी भाजपचे भिवंडी शहराध्यक्ष रवीकांत सावंत यांनी स्नेहा मेहुल पाटील यांची महापौरपदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली. यासंदर्भातील लेखी पत्र सर्व भाजप नगरसेवकांना देण्यात आले आहे. स्नेहा मेहुल पाटील या भाजपच्या अधिकृत महापौर पदाच्या उमेदवार आहेत, अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष सावंत यांनी दिली. या घडामोडीनंतर नारायण चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली. मला भाजपने अधिकृत उमेदवार जाहीर केले होते. मात्र महायुतीतील घटक पक्ष साथ देण्यास तयार नव्हते. त्यांच्यासोबत अनेक बैठकाही झाल्या, तरी एकमत झाले नाही. त्यानंतर पक्षाने अचानक स्नेहा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मी नाराज असून सेक्युलर आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेत आहे, असे चौधरी यांनी स्पष्ट केले.

महापौर निवडणूक अधिक चुरशीची

नव्या राजकीय समीकरणानुसार नाराज नारायण चौधरी यांना महापौरपदासाठी पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर काँग्रेसचे तारिक मोमिन हे उपमहापौरपदाचे संभाव्य उमेदवार मानले जात आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या वाट्याला स्थायी समिती सभापतीपद जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. या बदलत्या राजकीय घडामोडींमुळे महापौर निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

आजारपणात केलेल्या मृत्यूपत्राला मान्यता; मुंबई उच्च न्यायालयाने पत्नी, मुलांचा दावा फेटाळला

चंद्रा विरुद्ध टाटा! चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचे कायदेशीर आव्हान

अडवाणी, सिसोदियांना नोटीस; मतदारयादी तपासणीमध्ये पूर्वीच्या यादीशी मेळ न जुळल्याने कारवाई

Maharashtra TET Paper Leak : दोन फरार आरोपींना अटक

Mumbai : आयआयटी प्राध्यापक मंचाचा दुल्ला यांना पाठिंबा