ठाणे

बापरे! रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली लोखंडी सळई; Bhiwandi Metro च्या कामात निष्काळजीपणाचा कळस

"लोखंडी सळई रुग्णाच्या ३ ते ३.५ इंच डोक्यात शिरली आहे. पुढील ४८ ते ७२ तास आम्ही त्याच्या प्रकृतीबद्दल काहीही सांगू शकत नाही. ४८ ते ७२ तासांच्या कालावधीनंतरच शस्त्रक्रियेचा विचार करता येईल. डोक्याच्यावरील अर्धी सळई कापण्यात आली असून..."

Swapnil S

भिवंडी : ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ मार्गाच्या कामाच्या ठिकाणी मंगळवारी दुपारी एक भीषण आणि विचित्र अपघात घडला. शहरातील नारपोली ते धामणकर नाका दरम्यान सुरू असलेल्या मेट्रोच्या पुलावरून एक लांब लोखंडी सळई थेट रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर कोसळली आणि आत बसलेल्या प्रवाशाच्या डोक्यात घुसली. रमजान उर्फ सोनू अली (२०) असे गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. या घटनेमुळे मेट्रो प्रकल्पांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भिवंडीतील नारपोली ते धामणकर नाका दरम्यान घडली, जिथे ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ प्रकल्पाचे काम सुरू आहे. विठ्ठलनगर येथे राहणारा रमजान उर्फ सोनू अली (२०) हा तरुण रिक्षामधून प्रवास करत होता. त्यावेळी, मेट्रोच्या पुलावरून एक मोठी, सुमारे ७ ते ८ फूट लांब आणि २० मिमी जाडीची लोखंडी सळई खाली कोसळली. ही सळई रिक्षावर आदळून थेट सोनूच्या डोक्यात घुसली. या अपघाताने प्रवासी रक्तबंबाळ झाला असून या गंभीर दुखापतीनंतर ही तो ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणे शुद्धीवर होता.

डॉक्टर म्हणाले - सळई ३ ते ३.५ इंच डोक्यात; प्रकृतीबद्दल आताच सांगू शकत नाही

स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत त्याला उपचारासाठी जवळच्या अंजूरफाटा येथील नोबेल खासगी रुग्णालयात दाखल केले. अशातच मनसेच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी रास्ता रोको अंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवत संबधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अलीवर उपचार करणाऱ्या डॉ. सुधीर राठोड यांनी सांगितले की, लोखंडी सळई रुग्णाच्या ३ ते ३.५ इंच डोक्यात शिरली आहे. डोक्याच्यावरील अर्धी सळई कापण्यात आली असून रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी डॉक्टरांच्या पथकाने अनेक चाचण्या केल्या आहेत. पुढील ४८ ते ७२ तास आम्ही त्याच्या प्रकृतीबद्दल काहीही सांगू शकत नाही. ४८ ते ७२ तासांच्या कालावधीनंतरच शस्त्रक्रियेचा विचार करता येईल. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

हा अपघात कोणाच्या चुकीमुळे आणि कसा घडला याबाबत अधिक तपास स्थानिक भोईवाडा पोलिस करीत आहेत. यापूर्वीही १३ नोव्हेंबर २०२१ रोजी याच ठाणे -भिवंडी कल्याण मेट्रो प्रकल्प ५ चे काम सुरू असतानाही मोठा अपघात झाला होता. अंजूरफाटा येथील मराठा पंजाब हॉटेल समोर मेट्रोच्या लोखंडी पिलरच्या सळईच्या सांगाडा कोसळून ५ कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. मंगळवारी याच घटनेसारखी घटना पुन्हा घडल्याने मेट्रोच्या ठेकेदारांचा हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

एमएमआरडीएमार्फत ठेकेदाराला ५० लाखांचा दंड

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या घटनेसाठी स्थापत्य कंत्राटदार असलेल्या ॲफकॉन्स (Afcons) कंपनीला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. डेक स्लॅबसाठी दोन महिन्यांपूर्वी लावण्यात आलेल्या तात्पुरत्या आधार प्रणालीचा भाग असलेला हा रॉड खाली पडल्याने बांधकामाच्या ठिकाणच्या सुरक्षा नियमावलीवर चिंता व्यक्त केली जात आहे.

पर्यवेक्षणातील त्रुटींसाठी ५ लाखांचा दंड

अपघातानंतर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ॲफकॉन्सला सर्व वैद्यकीय खर्च उचलण्याचे आणि जखमींना पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ठेकेदारावरील ५० लाख रुपयांच्या दंडाव्यतिरिक्त, एमएमआरडीएने पर्यवेक्षणातील त्रुटींसाठी सिस्ट्रा-सीईजी-सिस्ट्रा (इंडिया) या कंपनीलाही ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

एक स्वतंत्र चौकशी समिती

या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी मेट्रो मार्ग २-ब चे जनरल कन्सल्टन्ट असलेल्या आयका (AICA) कंपनीच्या मुख्य सुरक्षा व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

"सोनू अलीच्या डोक्यात सळई शिरून तो गंभीर जखमी झाल्याची घटना संतापजनक असून मेट्रो पुलाच्या कामात दिरंगाई आणि हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित ठेकेदाराच्या विरोधात योग्य ती कारवाई करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा."
शादाब उस्मानी, कार्यकारी अध्यक्ष एआयएमआयएम भिवंडी.

मुंबईत परतीच्या पावसावर चक्रीवादळाचं सावट! पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ८व्या वेतन आयोगाच्या अटींना केंद्र सरकारची मंजूरी

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा पलटवार; हिकारू नाकामुराने केलेल्या अपमानाचा पटलावरच घेतला बदला

माज उतरला, माही खान वठणीवर आला! मनसेच्या इशाऱ्यानंतर काही तासांतच "मुंबई मेरी जान...जय महाराष्ट्र" म्हणत मागितली माफी

पंतप्रधान मोदी उद्या मुंबईत, IMW ला लावणार हजेरी; वाहतुकीत मोठे बदल - कोणते रस्ते बंद, कोणते पर्यायी मार्ग?