भिवंडी : भिवंडी महापालिकेतील तीन डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात मानधनावर काम करतानाच भिवंडी महापालिकेतही त्याच वेळेस काम करीत असल्याचे दाखवून मानधन लाटल्याचा प्रकार समोर आला आहे.
भिवंडी मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक फराज बहाउद्दीन यांनी वर्धिनि केंद्राची माहिती मागवली होती. अनेक डॉक्टर दुसरीकडे काम करून मानधन मात्र पालिकेकडून घेत असल्याचा आरोप पुराव्यानिशी बहाउद्दीन यांनी केला. त्यानंतर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती ईशा इम्रान खान यांनी दिले होते.
या तपासणीत डॉ. अब्दुल अन्सारी, डॉ. मौझम खान व डॉ. सोहन नाईक या तिघा एम.बी.बी.एस डॉक्टरांनी दोन आस्थापनांमधून मानधन घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. डॉ. अब्दुल रेहमान रईस अन्सारी यांची नेमणूक बंदर मोहल्ला येथे सुरू केलेल्या नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर येथे केली होती. डॉ. मौझम हुसेन खान यांची नुरीनगर येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे तर डॉ. सोहन नाईक यांची नेमणूक कारवली रोड येथील नागरी आयुष्मान आरोग्य मंदीर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. याच कालावधीत तिन्ही डॉक्टर स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय येथे कंत्राटी पद्धतीने काम करीत असल्या बाबतची माहिती स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षका डॉ. माधवी पंदारे यांनी वैद्यकीय विभागाला कळवले आहे.