अतुल जाधव/ठाणे
ठाण्यातील अनधिकृत आणि अधिकृत शाळांच्या संगनमताने होणारा शिक्षण क्षेत्रातील मोठा स्कॅम समोर आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आजच्या घडीला हजारो विद्यार्थी हे अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळांना गुणपत्रिका आणि दाखला देण्याचे अधिकार नसल्याने जी शाळा अधिकृत आहे आणि ज्या शाळेला शासनाचे अनुदान आहे, अशा काही शाळांच्या पटावर अनधिकृत शाळांच्या मुलांना दाखवून या सर्व मुलांना अधिकृत शाळेची गुणपत्रिका दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे काही रक्कम अधिकृत शाळांना दिली जात असल्याची गंभीर बाब मेस्टा या संघटनेने उघड केली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील पुरावे देऊनही शिक्षण विभागाच्या वतीने यासंदर्भात कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळा असून यामध्ये आजच्या घडीला हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र अनधिकृत शाळांच्या प्रश्न आजही शिक्षण विभागाला निकाली काढता आलेला नाही. गेल्या काही वर्षात अनधिकृत शाळांची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढली आहे. अनधिकृत शाळांविरोधात आवाज उठवणाऱ्या मेस्टा या संघटनेने ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादीच जाहीर केली आहे. यामध्ये ठाण्यात अनधिकृत शाळांची संख्या ही ४० वरून ७० च्या घरात पोहचली आहे. यामध्ये एकट्या दिव्यात सध्या ६५ अनधिकृत शाळा असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
अनधिकृत शाळांचा प्रश्न गंभीर असताना आता या शाळांच्या माध्यमातून होणारा स्कॅम हा वेगळाच गंभीर प्रकार असून यामुळे शिक्षण क्षेत्राचे पावित्र्यच धोक्यात आले आहे. आजच्या घडीला अनधिकृत शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात डोनेशन भरून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या अनधिकृत शाळांना गुणपत्रिका, बोनाफाईड आणि इतर कागदपत्रे देण्याचा अधिकार नाही. याशिवाय त्यांच्या गुणपत्रिकांना अधिकृत समजले जात नसल्याने अनधिकृत शाळांनी वेगळी शक्कल लढवली आहे. या अनधिकृत शाळा पोर्टलवर नसल्याने या स्कॅम उघड होत नाही. यासंदर्भातील पुरावे देखील संघटनेच्या वतीने देण्यात येऊनही अद्याप शिक्षण विभागाच्या वतीने कारवाई झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दिव्यातील शाळेत झालेला प्रकार निंदनीय
दिव्यातील अनधिकृत शाळेत झालेला प्रकार निंदनीय असल्याचे सांगत या संघटनेच्या वतीने या सर्व घटनेचा निषेध करण्यात आला आहे. एका शाळेमुळे सर्व शाळा बदनाम होत असून अशा अनधिकृत शाळेवर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी अधिकृत शाळांच्या समस्या देखील संघटनेच्या वतीने मांडण्यात आल्या.
अनधिकृत असलेल्या ७५ टक्के शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना अधिकृत आणि ज्या शाळांना अनुदान आहे, अशा काही शाळांशी हातमिळवणी करून अनधिकृत विद्यार्थ्यांना अधिकृत केले. याबाबत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आणि पॅनकार्ड हे शाळेत जमा करावे लागत असते. ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे, त्या शाळेत अशा विद्यार्थ्यांना दाखवण्यात येत असून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे ३ हजार ते ५ हजार घेतले जातात.
उत्तम सावंत, पदाधिकारी मेस्टा संघटना