ठाणे

ठाणेकरांच्या सुरक्षेसाठी सरसावले मुख्यमंत्री

दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीने दोन वर्षांपूर्वी शहरात सीसी कॅमेरे बसवण्यासाठी मंजुरी दिली होती.

प्रमोद खरात

ठाणे शहरात पालिकेच्या खर्चातून जे सीसी कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्यांची क्वॉलीटी आणि दर्जा योग्य नसल्याचा आक्षेप पोलीस प्रशासनाने नोंदविला होता. दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीने दोन वर्षांपूर्वी शहरात सीसी कॅमेरे बसवण्यासाठी मंजुरी दिली होती. या प्रस्तावाला ८ फेब्रुवारी २०२१ ठाणे पालिकेच्या विद्युत विभागाने तांत्रिक मान्यता दिली होती, तेव्हापासून हा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्यसरकारकडे प्रलंबित होता. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच ठाणेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचा समजला जाणारा निर्णय पहिल्याच आठवड्यात घेतला असून शहरात अत्याधुनिक सीसी कॅमेरे बसवण्यासाठी २ कोटी ९९ लाख ९७ हजार ३९७ रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

ठाणे शहरात गेल्या काही वर्षात कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेच्या प्रभाग सुधारणा निधीतून १२०८ सीसी कॅमेरे , वायफाय योजनेतून इतर असे एकूण १४९८ कॅमेरे बसविले आहेत. तसेच अन्य निधीतून १०० कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसी कैमरे देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदार कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती पंरंतु मार्च २०२१ रोजी या ठेक्याची मुदत संपली होती, कोरोनामुळे पालिकेचे उत्पन्न मर्यादित असल्याने नवे टेंडर काढण्यात आले नव्हते त्यामुळे या कॅमेऱ्यांची जवळपास तीन महिने देखभाल दुरुस्ती झाली नव्हती आणि महत्वाच्या ठिकाणावरील ३० ते ३५ टक्के सीसी कैमरे बंद झाले असल्याचे खळबळजनक वास्तव काही महिन्यांपूर्वी उघडकीस आले होते त्यामुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

दरम्यान याबाबत आरडा ओरड होताच निविदा काढण्यात आली, सीसी कॅमेरे दुरुस्ती आणि देखभाल निगराणीसाठी सहा महिन्यांनी ठेकेदार कंपनीची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे ठाणे शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पोलीसांच्या मदतीसाठी पालिकेने जे कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्यावर ठाणे पोलीसांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. ठाणे पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त यांनी या संदर्भात ठाणे महापालिकेच्या स्मार्टसिटी प्रकल्प योजनेच्या अतिरिक्त आयुक्तांना पत्र लिहून याबद्दलचा अहवाल सादर केला होता आणि सीसी कॅमेऱ्यांच्या गुणवत्तेवरच आक्षेप घेतले होते. सीसीटीव्ही कॅमेरे हे हल्लीच्या दृष्टीने महत्वाचे असून आतापर्यंत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही बाबत शंका निर्माण झाली आहे. याबाबत आजपर्यंत कोणीही आवाज उठविलेला नाही.

गुन्हेगारांना शोधण्यासाठी

सीसीटीव्हीचे महत्वाची मदत

ठाणे परिसरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पालिका प्रशासनाने नगरसेवक निधीतून बहुतांशी ठिकाणी सीसीटीव्ही केमेरे बसवले आहेत, हे कॅमेरे कायम बंद असतात असे आरोप करण्यात येत असले तरी ठाणे पालिका परिसरावर या तिसऱ्या डोळ्यांची करडी नजर असल्याचे उघड झाले आहे.

जवळपास ५००च्या वर गुन्हेगारी प्रकरणात आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले आहेत. तसेच बहुतांशी प्रकरणात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून यासाठी पालिकेने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा त्यांना चांगला उपयोग झाला आहे. ठाण्यातील सीसीटीव्हीमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसला आहे. सीसीटीव्हीच्या बळावर अनेक गुन्हे लवकर साडविले जातात. आता गल्लोगल्लीत सीसीटीव्ही असल्यामुळे नागरिक निश्चीतपणे वावरू शकतात.

शहरात जे सीसीटीव्ही केमेरे लावण्यात आले आहेत त्यावर २४ तास प्रशासनाचे लक्ष असते त्यासाठी हजूरी येथे सुस्सज डाटा सेंटर उभारण्यात आले असून त्या ठिकाणाहून दररोज अहवाल पाठवला जातो. जे कॅमेरे बंद असतात ते दुरुस्त करण्यासाठी तत्काळ संबंधित एजन्सीला आदेश दिले जातात. विशेष म्हणजे या कॅमेऱ्यातून जे चित्रण केले जाते.त्याचा डेटा सात दिवस सांभाळून ठेवला जातो आणि पोलसांनी मागणी केल्यास तो दिला जातो.

राजगृह हल्ला प्रकरणी

सहा दिवस मुंबई पोलीस होते ठाण्यात

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर मुंबई येथील राजगृह या निवास स्थानावर हल्ला झाल्यामुळे देशात तणावाचे वातावरण निर्माण

झाले होते. आरोपीचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता मात्र त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान मुंबई पोलिसांवर होते. आरोपी ठाण्याच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास येताच मुंबई पोलीस सहा दिवस ठाण्यात ठाण मांडून होते आणि पालिकेने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासात होते

अखेर याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले होते. त्याचबरोबर राबोडी येथे झालेली महिलेची हत्या, मनसेचे नेते जमील शेख हत्या या हत्येच्या आरोपीनंही सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनेच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान