मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोमवारची सकाळ अत्यंत वेदनादायी ठरली. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे येणाऱ्या लोकलमधून सकाळी ९.३० च्या सुमारास दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान तब्बल १० ते १३ प्रवासी खाली रुळावर पडून चार जणांचा नाहक जीव गेला. या दुर्घटनेमागचे मुख्य कारण रेल्वे रुळांवरील धोकादायक वळण असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेमुळे मध्य रेल्वे प्रशासनाचा अजून एक निष्काळजीपणाही समोर आलाय. अपघात झाला त्या ठिकाणच्या धोकादायक वळणाबाबत तीन महिन्यांपूर्वीच मनसेच्या एका कार्यकर्त्याने पत्र लिहून तक्रार केली होती आणि त्याच तरुणाला आज या अपघातात दोन्ही पाय गमवावे लागल्याचा दावा मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.
...तर आज त्याला दोन्ही पाय गमवावे लागले नसते
या घटनेत मनसेचा एक कार्यकर्ताही जखमी झाला आहे. या तरुणाने तीन महिन्याआधी याच धोकादायक वळणाबद्दल कल्पना देऊन रेल्वे प्रशासनाला सावध करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आज या दुर्घटनेत त्याला पाय गमवावे लागले असा धक्कादायक खुलासा मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. जाधव यांनी 'न्यूज १८ लोकमत'ला प्रतिक्रिया देताना सांगितले की, “कळवा रुग्णालयात जेव्हा प्रवाशांना आणलं तेव्हा मी सुरुवातीपासून इथे होतो. त्यांना प्रचंड मार लागला होता. अशा घटना वारंवार घडत आहेत. रोज एक ते दोन प्रवाशांचा रेल्वेतून पडून मृत्यू होतो. तीन महिन्यांपूर्वी टिटवाळा येथील कुणाल नामक मनसेच्या गटाध्यक्षासोबत ३-४ तरुणांनी मिळून मनसेकडून रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिले होते. यामध्ये मुंब्रा येथील धोकादायक वळण (Curve) आणि बाजूला असलेल्या सिग्नलबद्दल इशारा दिला होता, की इथे अपघात घडू शकतो. त्यावेळी जर प्रशासनाने दखल घेतली असती तर आज ही घटना घडली नसती. या घटनेत तक्रार करणाऱ्या तरुणांपैकीच एका तरुणाचे या अपघातात दोन्ही पाय गेले आहेत. त्याने जर सांगून प्रशासनाला जाग आली असती तर त्याला त्याचे पाय गमवावे लागले नसते. ही घटना घडली तिथे जो Curve आहे तिथे दोन ट्रेन एकमेकांना चिकटतात आणि जर दरवाज्याला तुम्ही लटकले असाल तर घासल्यानंतर माणसं खाली पडतात.''
जखमींमधील तीन जण 'त्याच' ग्रुपमधील
पुढे बोलताना अविनाश जाधव यांनी, वळणाबाबत तक्रार करणाऱ्या ग्रुपमधीलच तीन जण जखमी झाल्याचं सांगितलं. "एकाचा हात गेलाय, एकाचे पाय गेलेत आणि एक मुलगी आहे टिटवाळ्याची तिलाही खूप मार लागलाय. असे तीनजण त्याच ग्रुपमधील आहेत जे या सर्व तक्रारीचा फॉलोअप घेत होते", असे जाधव म्हणाले.
दुर्घटनेला धोकादायक वळण जबाबदार -
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या वळणावर रोजच काही ना काही अपघात किंवा माणसांच्या पडण्याच्या घटना घडत असतात, मात्र रेल्वे प्रशासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.