संतोष पाटील/वाडा
जिल्ह्यात ताप, सर्दी, खोकला, डेंग्यू, चिकनगुनिया आजाराने डोकवर काढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आजवर २५४ रुग्ण डेंग्यू, तर ५० रुग्ण चिकनगुनियाचे आढळल्याने रुग्णवाढीमध्ये पालघर जिल्हा अग्रेसर असल्याचे म्हटले जात आहे.
जिल्ह्यात मलेरियाचे सध्या पाचच रुग्ण आहेत मात्र डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २५४ असून चिकनगुनियाचे ५० रुग्ण आढळल्याने या आजारांना प्रतिबंध करण्यात आरोग्य विभाग कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. या आजारांकडे स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयामध्ये साथीच्या आजाराबरोबर गरोदर मातांची तपासणी देखील करण्यात आरोग्य विभाग कमी पडत आहे. सध्या गरोदर माता तपासणीसाठी येत असताना त्यांना ताप आदी आजार झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षतेसाठी प्रत्येक गरोदर मातांची झिकाच्या तापासणीसाठी रक्ताचे नमुने पुणे येथील लॅब मध्ये पाठवण्याच्या सूचना डॉक्टरांना देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात डेंग्यूच्या १ एक हजार ५११ जणांची रक्त तपासणी करण्यात आल्या असून यामध्ये २५४ रुग्ण आढळले. तर चिकनगुनियाचे २११ तपासण्या करण्यात आल्या, यामध्ये ५० रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य सेवकांना प्रत्येक गावागावात जाऊन डासांच्या आळ्या तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जनजागृती करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रामसेवकांची सभा घेऊन त्यांना सूचना देण्यात येत असल्याचे सांगितले जाते.
डास मारण्यासाठी धुराची फवारणी करण्यात येत असली तरी त्या फवारणीचा उपयोग अधिक काळ होत नसल्याचे दिसून येत आहे. घर व घराच्या आजूबाजूला भंगार सामान ठेवू नका, त्यामुळे पावसाळ्यात पाणी साठून डासांच्या अळ्या होणार नाहीत. पाण्याचे ड्रम उघडे ठेवू नका, ते झाकून ठेवा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
तालुका डेंग्यू चिकनगुनिया
पालघर ६४ १०
डहाणू ४६ ११
वाडा २३ ०१
जव्हार ३३ १३
मोखाडा २४ ४
तलासरी १७ ०
विक्रमगड १८ ६
वसई २६ २
जिल्ह्यात २५४ डेंग्यूचे, तर ५० चिकनगुनियाचे रुग्ण
जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा, वसई या आठही तालुक्यात डेंग्यू व चिकनगुनियाचे रुग्ण वाढू लागले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक ६४ रुग्ण पालघर तालुक्यात आहेत. तर चिकनगुनियाचे सर्वाधिक १३ रुग्ण हे जव्हार तालुक्यात असल्याचे आढळून आले आहे. सध्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत असल्यामुळे आरोग्य सेवकांमार्फत ग्रामीण भागात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. तसेच परिसरातील स्वच्छतेची पाहणी करण्यात येत आहे. - अश्विनी राव, जिल्हा हिवताप अधिकारी