ठाणे

उत्तनसह ६ गावांचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध; ३० दिवसांत हरकती व सूचना मागविण्याचे आवाहन

मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर पश्चिमेच्या उत्तन, पाळी, चौक, तारोडी, डोंगरी आणि मोर्वा या सहा गावांचा विकास प्रारूप आराखडा अखेर नऊ वर्षांनंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Swapnil S

भाईंंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर पश्चिमेच्या उत्तन, पाळी, चौक, तारोडी, डोंगरी आणि मोर्वा या सहा गावांचा विकास प्रारूप आराखडा अखेर नऊ वर्षांनंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या आराखड्यावर हरकती व सूचना मागवण्यासाठी पालिका आयुक्त कार्यालय व नगररचना कार्यालयात ३० दिवसांचा कालावधी दिला असून त्या काळात स्थानिक नागरिकांकडून अभिप्राय स्वीकारला जाणार आहे.

मुंबई महानगरपालिका हद्द व मीरा-भाईंदर महापालिका हद्द अंतर्गत आठ गावांसाठी २०१६ ते २०२१ दरम्यान मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाद्वारे मनोरंजन व पर्यटन क्षेत्र म्हणून स्वतंत्र विकास आराखडा प्रसिद्ध झाला होता. मात्र, त्या ठिकाणी अपेक्षित विकास न झाल्याने अतिक्रमणे व बेकायदा बांधकामे वाढली आणि स्थानिकांना त्रास सहन करावा लागला. सदर नवीन आराखडा मागील वर्षभर मीरा-भाईंदर नगररचना विभागाद्वारे तयार करण्यात आला. प्रारूप आराखडा बुधवारी महापालिका मुख्यालयात प्रसिद्ध करण्यात आला असून त्यात सहा गावांसाठी एकूण ६९ आरक्षणे दर्शवण्यात आली आहेत. मुख्य रस्त्यांची रुंदी वाढवण्यात आली असून नवीन विकास क्षेत्र तसेच सरकारी जागांवर विविध सुविधा आरक्षित करण्यात आल्या आहेत.

नागरिकांचे प्रश्न व तक्रारी

मुंबई उच्च न्यायालयाने २००६ साली खारफुटी क्षेत्रात आरक्षणे टाकू नये असा आदेश दिला होता, तरीही नवीन आराखड्यात या आदेशाचे उल्लंघन करून रहिवासी आरक्षणे दर्शविण्यात आल्याचा आरोप गो ग्रीन फाऊंडेशनचे ॲड. वीरभद्र कोनापुरे यांनी केला आहे. मेट्रो कार शेड आरक्षण रद्द करण्याची मागणी माजी सरपंच एडविन घोनसालविस यांनी केली आहे. त्यांनी म्हटले की, डोंगरी येथील डोंगरावर हे आरक्षण नियमांचे उल्लंघन असून शहराचा महत्त्वाचा ऑक्सिजन स्त्रोत नष्ट करत आहे.

प्रारूप आराखड्यातील महत्त्वाचे मुद्दे

मुख्य आरक्षणे: बायो डायव्हर्सिटी पार्क, संयुक्त स्मशानभूमी, एज्युकेशन सेंटर, स्पोर्ट्स अकादमी, चौपाटी, पार्किंग, फिल्म स्टुडिओ, पर्यटन केंद्र, औद्योगिक क्षेत्र, ४-५ एसटीपी प्लांट, खेळाचे मैदान, उद्याने, शाळा, महापालिका राखीव आरक्षणे.

मुख्य रस्त्यांची रुंदी सुधारित: उत्तन भागातील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाहून ४५ मीटर रस्ता आता ६० मीटर दर्शविला आहे. भविष्यात मीरा-भाईंदरचे प्रवेशद्वार उत्तन भाग ठरणार आहे.

पुढील प्रक्रिया

नगररचना विभागाकडून ३० दिवसांच्या मुदतीत हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. तज्ज्ञांच्या समितीकडे मिळालेल्या हरकतींची पाहणी करून आवश्यक बदल व सुधारणा करून अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध केला जाईल, असे सहाय्यक संचालक पुरुषोत्तम शिंदे यांनी सांगितले.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत