डोंबिवली (पूर्व) येथील वरचापाडा परिसरात २१ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी कुटुंबीयांना युवकाच्या मोबाईलमध्ये तरुणीसोबतचे एक धक्कादायक व्हॉट्सअॅप चॅट्स सापडले. या चॅट्सच्या आधारे एका २१ वर्षीय तरुणीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, युवक साहिल सहदेव ठाकूर याने २६ जून रोजी आत्महत्या केली. साहिलच्या आत्महत्येच्या दिवशी तो घरी एकटाच होता. त्याचे पालक धार्मिक यात्रेसाठी शहराबाहेर गेले होते. घरी परतल्यानंतर साहिल त्यांना लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आणि त्यानंतर पोलिसांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली.
प्रारंभी आत्महत्येचे कारण स्पष्ट नव्हते. मात्र, काही दिवसांनी कुटुंबीयांनी साहिलचा मोबाईल तपासला असता त्यात ‘बबली’ नावाच्या तरुणीबरोबरचे व्हॉट्सअॅप संवाद आढळून आले. चॅटमधील मजकूर पाहून कुटुंबीयांनी सोमवारी भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा मनीषा राणे यांची भेट घेतली. घटनेची माहिती घेत मनीषा राणे यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि संबंधित चॅट रेकॉर्ड अधिकाऱ्यांकडे सादर केले.
''घरी कोणीही नाही, स्वतःला फाशी घे''
या चॅट्समध्ये आत्महत्येच्या काही तास आधी दोघांमध्ये झालेल्या वादग्रस्त आणि मानसिक त्रास देणाऱ्या संवादाचा समावेश होता. विशेषतः आत्महत्येच्या आदल्या रात्री पहाटे २ ते ३.१५ दरम्यान फोनवर झालेल्या संभाषणात, तरुणीने साहिलला स्पष्टपणे फाशी घेण्यास प्रवृत्त करणारे वक्तव्य केल्याचे दिसून आले. "घरी कोणीही नाही, स्वतःला फाशी घे. नवीन साडी वापरू नको, जुनी साडी वापर," असा मजकूर तरुणीने पाठवला होता, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपन शिंदे यांनी या चॅटमधील मजकूर गंभीर स्वरूपाचा असल्याची पुष्टी केली आहे. उपलब्ध डिजिटल पुरावे आणि कुटुंबाकडून दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारावर, भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मृत आणि तरुणी यांच्यातील नातेसंबंधाचे स्वरूप, संवादाचे सर्व पैलू आणि मानसिक दबाव यांची सखोल तपासणी सध्या सुरू आहे.