डोंबिवली : डोंबिवलीत एका महिलेच्या नावे दोन निवडणूक ओळखपत्र आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुंभारखान परिसरातील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीला एकाच नावावर दोन ओळखपत्रे मिळाल्याचे दिसून आले आहे. एकावर त्यांचा मूळ फोटो असून, दुसऱ्यावर नाव व पत्ता तेच पण फोटो दुसऱ्या अनोळखी महिलेचा आहे.
या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या प्रकरणी आवाज उठवला आहे. कुंभारखानपाडा, डोंबिवली पश्चिम येथील श्री साई दर्शन बिल्डिंगमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी अशोक मंगेश कुलकर्णी कुटुंबासह राहतात. सुमारे सात-आठ महिन्यांपूर्वी त्यांच्या घरी पोस्टाने पाच निवडणूक ओळखपत्रे आली. अर्चना कुलकर्णी यांच्या पहिल्या ओळखपत्रात नाव, पत्ता आणि फोटो अचूक होते. मात्र दुसऱ्या ओळखपत्रात नाव व पत्ता तेच पण फोटो पूर्णपणे वेगळ्या महिलेचा होता. यामुळे त्यांच्या नावावर बोगस मतदानाचा मार्ग मोकळा होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
माझ्याच नावे दोन ओळखपत्र आले असून एका कार्डावर दुसऱ्या महिलेचा फोटो आहे. माझ्या नावावर बोगस मतदान होऊ शकते. निवडणूक आयोगाने त्वरित लक्ष द्यावे.अर्चना कुलकर्णी
हा निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराचा जिवंत पुरावा आहे. आयोगाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.प्रमोद कांबळे, उपशहरप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), डोंबिवली