ठाणे : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी नूतन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी मावळते जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून औपचारिकरीत्या पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पदग्रहणाच्या निमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मावळते जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आपल्या कार्यकाळातील ठाणे जिल्ह्यातील अनुभव, अंमलात आणलेली योजना, तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. त्यांनी डॉ. पांचाळ यांचे मनःपूर्वक स्वागत करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नवीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ हे भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) २००९ च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी यापूर्वी विविध पदांवर काम करत प्रशासनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ठाण्यात नियुक्ती होण्यापूर्वी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते.
डॉ. पांचाळ हे प्रशासनातील निर्णयक्षमता, पारदर्शक कारभार आणि नवकल्पनांच्या अंमलबजावणीत विशेष कौशल्य असलेले अधिकारी म्हणून परिचित आहेत.
ठाण्यासारख्या आर्थिकदृष्ट्या प्रगत आणि नागरी व ग्रामीण अशा दोन्ही भागांतील समस्यांचा समतोल राखणाऱ्या जिल्ह्याचे नेतृत्व करणे ही एक मोठी जबाबदारी आहे, असे सांगत त्यांनी जिल्ह्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय ठेवून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.