पालघर : अभियांत्रिकी विद्यालयाच्या दुसऱ्या वर्गात नापास झाल्यामुळे तिसऱ्या वर्गात शिकता येणार नसल्याचा न्यूनगंड मनात निर्माण झाल्याने तेजस मधुकर डुकले (१९) या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. तो विक्रमगड येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत होता. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कासा पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
घरच्या गरिबीवर मात करून तेजस हा विक्रमगड येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत होता. मधुकर बाबाजी डुकले हे करसोड डुकले पाडा येथील शेती करतात. इंजिनिअरच्या दुसऱ्या वर्गात शिकत असणारा तेजस नापास झाल्याने त्याला तिसऱ्या वर्षात प्रवेश मिळणार नाही, याची भीती निर्माण झाली. घरात कोणी नसताना नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कळताच तेजसला उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा अधिक तपास कासा पोलीस करीत आहेत.