उल्हासनगर : ‘सीबीआय अधिकारी’ असल्याचा बनाव, कमरेला बनावट पिस्तूल, हातात वॉकी-टॉकी आणि सोबत तरुणांची टीम घेऊन हॉटेल्सवर धाडसत्र राबवणाऱ्या भामट्याचा अखेर भंडाफोड झाला आहे.
ठाणे जिल्ह्यात गेली पाच वर्षे सुरू असलेल्या या थरारक फसवणूक प्रकरणाने ‘स्पेशल २६’ या चित्रपटाची आठवण करून दिली आहे. राजू पाटेकर नावाच्या आरोपीने बेरोजगार तरुणांना सीबीआयमध्ये नोकरीचे आमिष दाखवत लाखो रुपये उकळले, तसेच त्यांना बनावट ‘अंडरकव्हर ऑपरेशन’मध्ये सहभागी करून घेतले. अखेर विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत या बनावट साम्राज्यावर कारवाई सुरू केली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रहार गोडसे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. विठ्ठलवाडी पोलिसांच्या तपासात समोर आले की, आरोपी राजू पाटेकर हा स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणून सादर करत होता. हॉटेल्स, जीन्स कारखाने आणि विविध व्यावसायिक आस्थापनांवर अचानक धाड टाकत तो अधिकृत तपास सुरू असल्याचे भासवत असे. त्याच्या सोबत असलेले तरुणही स्वतःला सरकारी पथकाचा भाग समजून या कारवायांमध्ये सहभागी होत होते. प्रत्यक्षात मात्र या सर्व धाडी बनावट असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
आरोपीने ५० हून अधिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीच्या आमिषाने आपल्या जाळ्यात ओढले. ‘सीबीआयमध्ये भरती’ आणि ‘गुप्त प्रशिक्षण’ देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले गेले. या तरुणांना ‘अंडरकव्हर मिशन’चा भाग असल्याचे सांगून त्यांच्याकडून घरगुती कामे करून घेण्यात येत होती, तसेच बनावट धाडीत सहभागी करून घेतले जात होते. सीबीआयचे बनावट ओळखपत्र, ‘राजमुद्रा’ बॅच, केरळ पोलीस शैलीतील चिन्हे, चिप असलेले आयडी कार्ड, वॉकी-टॉकी सेट, एअर गन आणि अनेक सिमकार्डचा समावेश आहे. याशिवाय ‘क्राइम ब्युरो इन्व्हेस्टिगेशन ट्रस्ट’ नावाच्या बनावट संस्थेचे कागदपत्रेही सापडली आहेत.
हे प्रकरण अत्यंत धक्कादायक असून आरोपीने सरकारी यंत्रणेच्या नावाचा गैरवापर करत नागरिकांचा विश्वासघात केला आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेले साहित्य आणि डिजिटल पुरावे तपासात महत्त्वाची भूमिका बजावतील. या रॅकेटमागील इतर व्यक्तींनाही लवकरच समोर आणले जाईल.सचिन गोरे, पोलीस उपायुक्त-परिमंडळ ४