भाईंंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या उत्तन धावगी डोंगरावर राजरोसपणे बेकायदा कचरा डम्पिंग केले जात असताना त्यावर ठोस कारवाई न करणाऱ्या तसेच शुक्रवारी लागलेल्या आग प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
शुक्रवारी पुन्हा एकदा उत्तन येथील बेकायदा कचरा डम्पिंगला आग लागल्याने घातक धुराने परिसर व्यापून गेला. या घटनेने संतप्त ग्रामस्थंनी डम्पिंग ठिकाणी जाऊन महापालिकेचा निषेध केला व डम्पिंग तत्काळ बंद करण्याची मागणी केली. महापालिकेच्या अग्निशमन दलातील १० अग्निशमन वाहने यांनी ६ पाण्याच्या टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालवले. सदर आग विझवण्यासाठी पाण्याच्या टँकरच्या असंख्य फेऱ्या झाल्या. तर आग विझवण्यासाठी समुद्राचे पाणी न घेता आनंद नगर येथील तलावाच्या पाण्याचा उपसा केल्याने त्यावरून देखील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
ग्रामस्थांच्या मते, महापालिकेला शासनाने कचऱ्यावर प्रक्रियासाठी धावगी डोंगरावर मोफत जागा दिलेली असताना घनकचरा अधिनियमचे उल्लंघन करून महापालिका आणि कचरा वाहतूक करणारे ठेकेदार, वाहनचालक- मालक, स्वच्छता निरीक्षक आदी कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया न करताच कचरा डम्पिंगमध्ये बेकायदा टाकत आहेत.
त्यामुळे येथे कचऱ्याचा प्रचंड मोठा डोंगर निर्माण होऊन लिचेडमुळे खालची शेत जमीन नापीक झाली असून विहरीचे पाणी खराब झाले आहे. बेकायदा कचरा डम्पिंगमुळे उत्तन, पाली, डोंगरी, तरोडी, चौक आदी गावात दुर्गंधी पसरते.
सदर कचऱ्याच्या डोंगरास आग लागणे हे नेहमीचे झाले असून त्यातून मोठ्या प्रमाणात घातक विषारी धूर पसरत असल्याने नागरिकांचा श्वास कोंडला आहे. आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचे आरोप स्थानिकांनी सातत्याने केले आहेत.
दोन वेळा आपले सरकार वर तसेच केंद्रीय प्रदूषण मंडळाकडे तक्रार करून देखील महापालिका जाणीवपूर्वक खोटी माहिती देत आहे. राज्य प्रदूषण मंडळाचे कोणीही नियमित येऊन पाहणी करत नाही व पालिकेवर कारवाई करत नाही. त्यामुळे पालिका आणि प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना तसेच कचरा वाहतूक करणारे, लेव्हलिंग करणारे व ठेकेदार वर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे.
- एरीक मेंडोन्सा ( स्थानिक ग्रामस्थ )
महापालिका इतकी वर्षे केवळ खोटी आश्वासने देत आली आहे. प्रत्यक्षात दुर्गंधी, आग, धूर, लीचेडमुळे जमिनी नापिकी होणे हे थांबलेले नाही. डम्पिंगमुळे स्थानिकांचे जगणे नकोसे झाले आहे.
- वेन्सी नुनीस ( स्थानिक ग्रामस्थ )