नितीन बोंबाडे/ पालघर
पालघर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून चांगला पाऊस दाखल झाला, असून नदी, नाल्यामध्ये पाणी भरभरून वाहत आहे. पहिल्या पावसात मिळणाऱ्या चढणीचे (वलगणीचे) मासे मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांनी नदी-नाले गाठले आहेत. तर समुद्रातील मासेमारी बंद झाल्यामुळे सध्या खवय्यांनी देखील आपला मोर्चा गोड्या पाण्यातील माशांकडे वळवला आहे.
पावसाळापूर्वी बहुतांशी नद्या या प्रवाहित असल्या तरी डोंगर-दऱ्यातील पाण्याचे झरे लुप्त झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी होतो. या काळात नद्यांमधील मासे नदी-नाल्यांच्या डोहात जमतात. पावसाळा सुरू झाला की डोंगर-दऱ्यातून नदीला मिळणाऱ्या पाण्यामुळे नदीचा प्रवाह पूर्ववत होऊन माशांना ताजे पाणी मिळते. या ताज्या पाण्याच्या ओढीने मासे सैरभैर होऊन प्रवाहाच्या उलट्या दिशेने तर काही प्रवाहसोबत पोहत जातात. नेमका याच काळात माशांचा प्रजनन काळ असल्यामुळे मासे कमी पाण्याचे क्षेत्र शोधून तिथे अंडी घालण्यासाठी येतात. कमी पाण्यात येण्याच्या प्रयत्नात मासे शेताच्या पाण्यात आणि छोट्या ओहोळांमध्ये येतात. हे मासे मिळवण्यासाठी लोक छोट्या ओहोळांमध्ये आणि पाण्याच्या प्रवाहाच्या भागात माशांचे जाळे (पागेर) आणि झोलवा घेऊन मासे पकडण्यासाठी सज्ज होतात.
समुद्रातील मासेमारी बंद झाल्यामुळे खवय्ये सध्या गोड्या पाण्यातील मासे मिळविण्यासाठी वळले असून पहिल्या पावसात मिळणाऱ्या चढणीच्या माशांना बाजारात चांगली मागणी आहे. चढणीच्या काळात मिळणारे मासे हे बहुतांशी संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास मिळून येत असून लोकं रात्रभर जागून मासे गोळा करतात. मिळवलेले मासे घरी खाण्यासाठी ठेऊन उरलेले मासे विक्री करून चांगला नफा मिळवता येतो.
चढणीच्या पावसात मिळणारे मासे आणि बाजार भाव
पहिल्या पावसात चढणीच्या काळात कडवाली, शेगट, मल्या, पाती, दंडावणी, नीह्या, कालोसा, नार शिंगाळी, काळी शिंगाळी यासारखे मासे मोठ्या प्रमाणात मिळून येतात. बाजारामध्ये सध्या गोड्या पाण्यातील माशांना मोठी मागणी असून छोटे मासे प्रत्येकी ५० ते १०० रुपये वाटा आणि मोठे मासे २०० ते ३०० रुपये किलो प्रमाणे विक्री केले जात आहेत. यामुळे मासे पकडणाऱ्यांना चांगला नफा मिळवता येत आहे.