मुंबई : गेल्या वर्षी फेब्रुवारीत उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करा, अशी मागणी शिंदे सेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायालयाने सरकारला नोटीस बजावली आहे.
कल्याण पूर्वेकडील भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधातील गुन्ह्याचा तपास पोलिसांनी योग्य पद्धतीने केलेला नाही. हा तपास विशेष तपास यंत्रणा किंवा सीबीआयमार्फत सखोलरीत्या करणे आवश्यक असून त्याबाबत न्यायालयाने निर्देश द्यावेत, अशी विनंती महेश गायकवाड यांनी केली आहे. त्यांच्या याचिकेची न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली. याचवेळी उल्हासनगर पोलीस दलाचे तपास अधिकारी आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली. पोलीस आणि सरकारने याचिकेवर उत्तर दाखल करून भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. याप्रकरणी २५ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दोन दिवसांपूर्वीच गणपत गायकवाड व त्यांच्या साथीदारांचा जामीन अर्ज एकलपीठाने फेटाळला होता. त्यापाठोपाठ ही याचिका दाखल झाल्याने गायकवाड यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे.
तपासात अपयश आल्याचा दावा
कथित हल्ला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये व इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे केलेला नाही. गुन्हे शाखा सर्व बाजूंनी तपास करण्यात सपशेल अपयशी ठरली आहे, असा दावा याचिकेत केला आहे.