घोडबंदर मार्गावर आधुनिक सिग्नल यंत्रणा; तीन कोटी चार लाख रुपये खर्च, वाहतूककोंडी कमी होण्याची अपेक्षा प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

घोडबंदर मार्गावर आधुनिक सिग्नल यंत्रणा; तीन कोटी चार लाख रुपये खर्च, वाहतूककोंडी कमी होण्याची अपेक्षा

घोडबंदर मार्गाचे रुंदीकरण आणि सेवा रस्ते जोडण्याचे काम सुरू असतानाही वाहतूककोंडीचा प्रश्न कायम असल्याने ठाणे महापालिकेने आता सिग्नल यंत्रणा आधुनिक करण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

ठाणे : घोडबंदर मार्गाचे रुंदीकरण आणि सेवा रस्ते जोडण्याचे काम सुरू असतानाही वाहतूककोंडीचा प्रश्न कायम असल्याने ठाणे महापालिकेने आता सिग्नल यंत्रणा आधुनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. पातलीपाडा ते नागलाबंदरदरम्यानच्या सहा प्रमुख जंक्शनवर आधुनिक सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे तीन कोटी चार लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोन स्तरांवर सिग्नल बसविण्यात येणार असल्याने वाहनचालकांना चौकापासून दूर अंतरावरूनच सिग्नलची स्थिती स्पष्टपणे समजणार आहे. यामुळे वाहतुकीचे नियोजन अधिक सुलभ होऊन कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

घोडबंदर मार्गावर वाहनांची वाढती संख्या आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) मुख्य रस्ता आणि सेवा रस्ते एकमेकांना जोडण्याचे काम सुरू आहे. या कामांमुळे रस्त्याची रुंदी वाढली असून, काही ठिकाणी चौकांच्या रचनेतही बदल झाले आहेत. मात्र, रस्त्याच्या नव्या रचनेच्या तुलनेत जुनी सिग्नल यंत्रणा अपुरी ठरत असल्याने ती आधुनिक करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सध्याचे सिग्नल कमी उंचीवर असल्याने ते दूरवरून स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यामुळे चौकाजवळ आल्यानंतरच वाहनचालकांना सिग्नलची स्थिती लक्षात येते. परिणामी, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणे, अचानक वेग कमी करणे आणि चौकातील वाहतुकीचे नियोजन करताना अडचणी निर्माण होतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने सिग्नल यंत्रणा सुधारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

सहा जंक्शनवर सुधारित यंत्रणा

पातलीपाडा जंक्शन, विजय गार्डनजवळील डी-मार्ट परिसर, आनंदनगर जंक्शन, कासारवडवली जंक्शन, ओवळा जंक्शन आणि नागलाबंदर जंक्शन या सहा ठिकाणी आधुनिक सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार आहे. सध्या सिग्नल असलेल्या ठिकाणीच सुधारित यंत्रणा बसविण्यात येईल. रस्त्याची रुंदी, चौकाची रचना आणि वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन सिग्नलची उंची व मांडणी निश्चित केली जाणार आहे.प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोन स्तरांवर सिग्नल बसविण्यात येणार असल्याने चौकापासून दूर असलेल्या वाहनचालकांनाही ते सहज दिसतील. त्यामुळे सिग्नलनुसार वाहनांचा वेग नियंत्रित करणे आणि चौकात प्रवेश करण्याचे नियोजन करणे सोपे होणार आहे.

तीन वेळा निविदा प्रक्रिया; अखेर कंत्राटदार निश्चित

आधुनिक सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी कंत्राटदार निश्चित करताना महापालिकेला अडचणींचा सामना करावा लागला. या कामासाठी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या वेळी दोन कंपन्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने त्यांच्या निविदा बाद करण्यात आल्या. दुसऱ्या वेळी केवळ एकच निविदा प्राप्त झाली. त्यामुळे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. या प्रक्रियेत दोन कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर ट्रॅफिकटेक सोल्यूशन या कंपनीची कंत्राटदार म्हणून निवड करण्यात आली आहे.

पोलिसांच्या मंजुरीनंतर कामाला सुरुवात

घोडबंदर मार्गावरील ज्या चौकांमध्ये रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, तेथे प्रथम सिग्नल यंत्रणा सुधारण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित जंक्शनवर टप्प्याटप्प्याने काम केले जाईल. सिग्नल बसविण्याची जागा आणि आराखड्याला वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांची मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेच्या महासभेची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP ची दिल्लीत उद्या तिरंगा रॅली; सरकार देशात अघोषित आणीबाणी लादतंय - अभिजित दीपकेंचा आरोप

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा शुल्क घेतल्यास महाविद्यालयांवर होणार कारवाई, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

विहिरी, बोअरवेलने गाठला तळ; ग्रामीण जनजीवन विस्कळीत होण्याची भीती

... तर द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होतील; भारत-चीन सीमावादावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा स्पष्ट इशारा

दिवाळीभेट! शेतकऱ्यांना पाच हजाराची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर