बदलापूर: एकीकडे उकाडा वाढू लागला असतानाच रविवारी मध्यरात्री तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होऊन बदलापूरात सुमारे ७ तास वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे उकाड्यात अंधारात रात्र आणि सकाळही विजेविना असा अनुभव बदलापूरकरांना घ्यावा लागला.
फेब्रुवारी उजाडल्यापासून तापमानात वाढ होऊ लागली असल्याने नागरिक उकाड्याने हैराण होऊ लागले आहेत. त्यात गेल्या आठवड्यापासून अधूनमधून महावितरणचा वीजपुरवठाही खंडित होऊ लागला आहे. रविवारी मध्यरात्रीही कात्रप भागात अचानक वीज पुरवठा खंडित झाला. मोरीवली अंबरनाथ सब स्टेशन येथे टॉवर लाईनचे काम सुरू असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून हे काम पूर्ण होण्यास चार ते पाच तास लागतील, अशी माहिती बदलापूर पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सुराडकर यांनी दिली होती.
त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास वीजपुरवठा सुरू झाला. परंतु पुन्हा सकाळी ४.३० वा. सुमारास खंडित होऊन ९.३० वा. च्या सुमारास सुरू झाला. मात्र तो अत्यंत कमी दाबाने असल्याने असून नसून सारखाच होता. अखेर सकाळी ११.३० वा. च्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत सुरू होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. त्यामुळे रात्र अंधारात आणि सकाळही विजेविना असा अनुभव नागरिकांना घ्यावा लागला.
संपर्क क्रमांकाला प्रतिसाद नाही
रविवारी मध्यरात्री वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने तो केव्हा पूर्ववत होणार याबाबत माहिती घेण्यासाठी नागरिक कात्रप भागातील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. याबद्दल नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. अखेर कार्यकारी अभियंत्यांना याबाबत कळविण्यात आल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच विविध व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून काम सुरू असल्याबाबत फोटोसह माहिती देण्यात आली.