ठाणे

महामार्गाचे काम रखडले; मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पुलांची कामे अद्याप अपूर्ण

लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन नेतेमंडळींनी आपल्या भाषणातून दिले होते; मात्र सध्या सुरू असलेले काम संथगतीने सुरू असून मार्गावरील अनेक पुलांची कामे अद्याप अपूर्ण आहेत.

Swapnil S

धनंजय कवठेकर/ रायगड

लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन नेतेमंडळींनी आपल्या भाषणातून दिले होते; मात्र सध्या सुरू असलेले काम संथगतीने सुरू असून मार्गावरील अनेक पुलांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. ही सर्व कामे पूर्ण होण्यास कमीत कमी दोन वर्षे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळपर्यंतच्या रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे; मात्र नागोठणे, कोलाड, पुई, माणगाव येथील प्रमुख पुलांचे काम अद्याप वेग धरू शकलेले नाही. पळस्पे ते इंदापूर हा ८४ किलोमीटरचा रस्ता सर्वांत तापदायक होता. याचे दोन टप्प्यांत विभाजन केल्यानंतर पळस्पे ते कासूपर्यंत काम पूर्ण होत आले आहे; मात्र त्यानंतरचे काम अनेक ठिकाणी ठप्प आहे.

त्यामुळे नव्याने सत्तेत आलेले महायुती सरकार तरी महामार्गाकडे गांभीर्याने लक्ष देईल, अशी अपेक्षा प्रवासी तसेच वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. पळस्पेपासून माणगावपर्यंत पूर्ण झालेल्या मार्गाच्या दुभाजकामध्ये शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. काही ठिकाणी दिशादर्शक फलक लावून काम पूर्ण होत असल्याचे दाखवण्यात येत आहे; मात्र वडखळपासून कशेडी खिंडीपर्यंत महामार्गाची पाहणी केली असता प्रमुख पुलांचे काम २० टक्केही पूर्ण झाले नसल्याचे दिसून येत आहे.

या उड्डाणपुलांसाठी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करावा लागणार आहे, तर काही पुलांचे काँक्रीटीकरण काढावे लागणार आहे. जुन्या आराखड्यानुसार हे काँक्रीटीकरण झाले असून आताच्या वाढलेल्या वाहतुकीला ते अडथळ्याचे ठरत आहे. या उड्डाणपुलाच्या कामाला वेळ लागेल, याचे स्पष्टीकरण मध्यंतरी माजी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर भाषणात केले होते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.

माणगाव बायपासचे काम न केल्याने चेतक कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आचारसंहितेनंतर बायपासच्या कामासाठी निविदा काढल्या जाणार होत्या. माणगावच्या दुतर्फा रस्ता तयार करणे गरजेचे आहे. तिथे १०० वॉर्डन्स लावण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे. त्याच्या पुढच्या रस्त्याचे काम एलएनटीकडे असून बहुतांश काम पूर्ण झाले आहे.

इंदापूरपर्यंत रस्ता मार्चपर्यंत पूर्ण होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या ८४ किलोमीटर मार्गातील १० किलोमीटरचे काम शिल्लक आहे. हे काम प्रगतिपथावर आहे. आमटेम, नागोठणे, कोलाड, पुई आणि पुढे इंदापूर येथील काही टप्प्यांचा समावेश आहे. रस्त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे.

- यशवंत घोटकर, प्रकल्प संचालक,राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव