जव्हार : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने, जव्हार शहरात उष्णेतेमुळे लहान बालकांपासून ते अबाल वृद्धांना तीव्र उन्हाचे चटके चांगलेच जाणवत आहेत. उन्हापासून थंडावा मिळावा म्हणून नाना प्रकारे उपाय केले जात आहेत, या सगळ्यांत आइस्क्रीमला अधिक पसंती मिळत आहे. मात्र सर्वत्र महाजन नागरिकांचे कंबरडे मोडून टाकले असल्याने त्याचा फटका आइस्क्रीमच्या दराला बसल्याने आइस्क्रीमला देखील महागाईच्या झळा लागल्या आहेत.
दुधाच्या दरासह कच्च्या मालाच्या दरात कमालीची वाढ झालेली आहे, दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. असे असले तरी वाढते ऊन पाहता विक्रीत २० टक्के वाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी बोलत आहेत. सध्या बाजारात फॅमिली पॅकची किंमत १९० रुपयांवरून २२० रुपयांवर गेलेली आहे. उष्णतेत वाढ झाल्याने आइस्क्रीम पार्लरमध्ये ग्राहकांची गर्दीसुद्धा वाढू लागली आहे. सध्या अनेक नवीन फ्लेवर्स बाजारात आले आहेत, पण केशर पिस्ता आणि बटर स्कॉच आणि सोबतीला कुल्फी सदाबहार आहेत. त्यापाठोपाठ ब्लॅक फॉरेस्ट, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, राजभोग, रजवाडी या फ्लेवर्सलाही पसंती असते. आइस्क्रीम एक कपची सुरुवात १० किंवा २५ रुपयांपासून सुरू होते. त्यात कोन, स्टीक आणि फॅमिली पॅकही छोट्या आकारात उपलब्ध आहे.
फ्रोझन डेझर्ट आणि पिवर मिल्सच्या सहाय्याने तयार केलेले आइस्क्रीम बाजारात आहेत. ग्राहकांमध्ये जनजागृती वाढू लागल्याने पिवर मिल्स आइस्क्रीमला मागणी वाढलेली आहे. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने यंदा १५ ते २० टक्के आइस्क्रीमच्या दरात वाढ झालेली आहे.
-अजय शिंदे, आइस्क्रीम फेरीवाला