ठाणे

वाहनचोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; ७ कोटी ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Swapnil S

भाईंदर : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या काशिमीरा गुन्हे शाखा युनिट-१ने वाहनचोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. तसेच १६ गुन्ह्यांची उकल करून चार जणांना अटक करत ४७ वाहने जप्त केली आहेत.

काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत १६ जानेवारी २०२१ रोजी हायवा ट्रक क्र. एम.एच.४७ वाय ४९९५ हा चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर ३० जून २०२१ रोजी वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयशर टेम्पो चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता. सदरील गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून काशीमिरा गुन्हे शाखा युनिट-१ यांनी तपास करण्याचे आदेश तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दिले होते. त्यानुसार मागील तीन-चार वर्षांत आयुक्तालयात चोरी झालेल्या वाहनांचा तपास सुरू केला होता. त्यात पोलिसांनी तांत्रिक तपास करत त्याचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नांदेड जिल्ह्यात जोडत गॅरेज चालक व ड्रायव्हर गाडी खरेदी-विक्री व्यावसायिक यांना बनावट कागद पत्रांच्या आधारे परराज्यात नोंदणी करून विक्री करणाऱ्यांना चार जणांना अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखा पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आरोपी अजहर शेख (३५ वर्षे, व्यवसाय-गॅरेज, रा. धारखेड) व समीर नसीर खान (४१ वर्षे, रा. खंडाळा) आणि अमरावती येथील मोहम्मद शकील शाह (४८ वर्षे, व्यवसाय- गाडी खरेदी-विक्री रा. वलगाव रोड, अमरावती) तसेच शेख नशीर शहजादमिया (४३ वर्षे, व्यवसाय-ड्रायव्हर/गाडी खरेदी-विक्री, रा. नांदेड) यांना अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान आरोपींनी प्रथमतः खोट्या कागदपत्रांच्या आधारे गाड्या अस्तित्वात नसताना अरुणाचल प्रदेश, नागलँड इ. राज्यांतील विविध आरटीओ कार्यालयामध्ये गाड्यांचे रजिस्ट्रेशन करून नंबर व इतर कागदपत्रे प्राप्त केली. त्या कागदपत्रांच्या आधारे सदरची वाहने महाराष्ट्र राज्यात पुन्हा रजिस्ट्रेशन करावयाची आहेत असे सांगून संबंधित आरटीओ कार्यालयाची ऑनलाईन एनओसी प्राप्त केली. तद‌्नंतर कागदपत्रांवर नमूद असलेल्या मेक आणि मॉडेलप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांतून गाड्या चोरी केल्या. चोरलेल्या गाड्यांचे मूळ इंजिन नंबर, चेसिस नंबर व इतर ओळख पटविण्यासाठी लागणारे नंबर खोडून त्यावर बनावट कागदपत्रांवरील इंजिन, चेसिस नंबर प्रिंट करून महाराष्ट्रातील आरटीओमध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन केले व त्या गाड्या इतर लोकांना विक्री केल्या.

पोलीस तपासात आरोपीकडून एकूण ७ कोटी ३२ लाख ४१ किमतीची चोरीची ४७ वाहने त्यात टाटा ट्रक १४, हायवा टिपर- १०, आयशर टेम्पो ८, अशोक लेलँड ट्रक/टेम्पो ९, मारुती सुझुकी आर्टिगा १, मारुती सुझुकी वॅगनार १, मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर १, टोयोटा इनोव्हा १, फोर्स क्रुझर १ व महिंद्रा जितो १ अशी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस