मुंबई : कल्याण ते बदलापूर तसेच नेरळ स्थानकाजवळील विविध कामे करण्यासाठी शनिवारी आणि रविवारी ब्लॉकचे नियोजन मध्य रेल्वेने केले होते. मात्र मध्य रेल्वेने हा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे गुढीपाडव्यानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेमार्गावर शनिवारी आणि रविवारी कल्याण ते बदलापूर दरम्यान मध्यरात्रीचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. तर नेरळ स्थानक येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी रविवारी सकाळी ८.३० ते दुपारी २.३० पर्यंत विशेष ब्लॉक घेण्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले होते. यामुळे मेल/ एक्स्प्रेस आणि लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. तसेच अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लोकल फेऱ्या अंशत: रद्द केल्या होत्या. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार होती. ब्लॉक रद्द केल्याने रद्द केलेल्या लोकल गाड्या नियोजित वेळापत्रकानुसार चालतील. तसेच ब्लॉकमुळे वळवलेल्या सर्व मेल/एक्स्प्रेस गाड्या आता त्यांच्या नियोजित मार्गांनुसार आणि वेळापत्रकानुसार धावतील, असे मध्य रेल्वेने कळविले आहे.