डोंबिवली : केंद्रात व राज्यात भाजपा व शिवसेना (शिंदे गट) युती असून सत्तेत बसले आहेत. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. युती धर्म पाळायला हवा असे म्हणणारे दोन्ही पक्ष एकमेकांचे माजी नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रवेश करून घेत आहेत. निवडणुकीच्या निकालापूर्वीच महापौर कोणाचा बसणार यात रस्सीखेच सुरु आहे.
पुढील वर्षी कडोंम पालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या कामाला सर्वच राजकीय पक्ष लागेल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अप) भाजपा व शिवसेनेबरोबर हात मिळवून केल्याने महायुती बनली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती होईल की नाही याबाबत स्पष्टता नाही. तरीही भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी भाजपाच महापौर बसणार असे जाहीरपणे बोलण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे आता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘ये पब्लिक हे सब जानती हे’ असे म्हणत जनता जनार्दन ठरवेल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
निवडणुकीपूर्वीच भाजपा आमचाच महापौर बसणार याचा दावा करत आहे. आतापर्यंत कडोंमपाचे महापौरपद हे शिवसेनेकडे होते. आता भाजपच्या महापौरपदाच्या दाव्यावरून शिवसेना (शिंदे गट) कोणती चाल खेळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसेने अजून आपले पत्ते खुले केले नसले तरीही महापौरपदाचे गणित आमच्याशिवाय सुटणार नाही, असे डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी स्पष्ट केले.
संतोष केणे, राहुल केणे, प्रणव केणे, जितेंद्र भोईर, नंदू म्हात्रे व हृदयनाथ भोईर यांनीही भाजपात प्रवेश केला.तर माजी नगरसेवक सदाशिव शेलार यांनी मात्र शिवसेनेत प्रवेश केला.
ही मनपा निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढावी. आता याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे काँग्रेसचे पदाधिकारी नवीन सिंग व जिल्हाअध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शप) डोंबिवली अध्यक्ष भाऊ पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली नाही.