कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मांसबंदी आदेशाविरोधात शुक्रवारी मोठे आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षांचे कार्यकर्ते आणि मांस विक्रेत्यांच्या संघटनांनी यात सहभाग घेतला. आंदोलकांनी जिवंत कोंबडे हातात घेऊन थेट पालिकेसमोर धडक देत घोषणाबाजी केली आणि आदेश मागे घेण्याची मागणी केली.
पालिकेने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व कत्तलखाने आणि मांस विक्री २४ तास बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. हा आदेश १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून १५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार असून शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या व मोठ्या जनावरांची कत्तल यावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास महानगरपालिका कायद्यानुसार कारवाई होणार असल्याचा इशाराही देण्यात आला होता.
काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेचे कार्यकर्ते या आंदोलनात उतरले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे म्हणाले, "रोज सकाळी एक कोंबडा लोकांना जागवतो, आज आम्ही प्रशासनाला जागवण्यासाठी आलो आहोत."
आंदोलनादरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शिवाजी चौक ते शंकरराव चौक परिसरात सुरक्षा तैनात केली होती. राज्य राखीव पोलीस दलाची मदत घेतली गेली. महापालिका परिसराच्या १०० मीटर अंतरावर वाहनांना प्रवेशबंदी होती. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आदेश सरकारी निर्देशांनुसार असल्याचे सांगितले. नागपूर, नाशिक, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथेही अशीच मांसबंदी लागू करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी हा निर्णय वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा असल्याचा आरोप केला. तर भाजपने १९८८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी अशीच मांसबंदी लागू केल्याची आठवण करून दिली.