कल्याणमध्ये वृद्धावर जीवघेणा हल्ला; CCTV कॅमेऱ्यात घटना कैद 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

कल्याणमध्ये वृद्धावर जीवघेणा हल्ला; CCTV कॅमेऱ्यात घटना कैद

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात मालमत्ता वादातून वृद्धावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Swapnil S

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात मालमत्ता वादातून वृद्धावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कल्याण पूर्वेतील नाना पावसे चौक, कोळसेवाडी परिसरात २४ मार्च रोजी दुपारी दरम्यान ही घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक सांगळे हे दुचाकीवरून घरी जात असताना निलेश दुबे या तरुणाने त्यांचा रस्ता अडवत वाद घातला. वाद वाढताच दुबे याने सांगळे यांना भररस्त्यात बेदम मारहाण केली.

विवेक सांगळे यांच्या म्हणण्यानुसार, प्रथम ठोसे मारून त्यांना गाडीवरून खाली पाडले. त्यानंतर लाकडी दांडक्याने त्यांच्या डाव्या कानाजवळ जोरदार फटका मारण्यात आला आणि छातीवर लाथा मारत हल्ला सुरूच ठेवला. या झटापटीदरम्यान सांगळे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तुटून हरवल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. जखमी अवस्थेत त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

दरम्यान, आरोपी निलेश दुबे यानेही सांगळे यांनी गाडी अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही बाजूंनी परस्पर गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, याआधीही दुर्गा माता मंदिराजवळील ओम सीता निवास म्हणून इमारत आहे आणि या इमारतीमध्ये सांगळे यांचे रेशनचे दुकान आहे आणि त्याच इमारतीमध्ये दुबे राहतात. त्या ठिकाणच्या जागेचा वाद हा गेले काही महिन्यापूर्वी झाला होता. त्यावेळी परप्रांतियाकडून मराठी माणसाची जागा हडपण्याचा आरोप करत मनसेने मोठा गोंधळ घातला होता. मात्र यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.

आता पुन्हा भररस्त्यात मारहाण झाल्याने त्याच वादातून मारहाणीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

ठाण्यात भाजपला डावलल्याचा आरोप; 'सात प्रकल्पांचे पुन्हा उद्घाटन करा', आयुक्तांना पत्र

लातूरमध्ये माथेफिरू प्रवाशाने ओढले स्टेअरिंग; एसटी दोन स्कूलबसना धडकली, ५ जण जखमी, Video

कोल्हापूर-सांगलीचा पूर रोखणार; ३२०० कोटींची योजना; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Bhayandar : लग्नाच्या रिसेप्शनला न गेल्यावरून पती-पत्नीमध्ये वाद; आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेला मुलगा चाकूचा वार लागून ठार