कल्याण-शीळफाटा रस्ता हा प्रचंड वाहतूक कोंडीसाठी ओळखला जाणारा महत्त्वाचा मार्ग. मुंबई व ठाण्याकडून दररोज हजारो प्रवासी या मार्गाने डोंबिवली, कल्याण, बदलापूर भागात जातात. विशेषतः संध्याकाळच्या वेळी येथे वाहतूक मोठ्या प्रमाणात संथ होते. याच दरम्यान कल्याण-तळोजा मेट्रो लाईन १२ प्रकल्पाच्या कामाचा एक महत्त्वाचा टप्पा सुरू होत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक १० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या २० दिवसांच्या काळासाठी तात्पुरती वळवण्यात येणार आहे. याबाबत ठाणे वाहतूक पोलिसांनी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
या कालावधीत सोनारपाडा चौक ते मानपाडा चौक (कल्याणच्या दिशेने) पिलर क्र. ११७ ते १८९ दरम्यान सिमेंट गर्डर बसविण्याचे काम चालणार आहे.
वाहतूक कुठे बंद असणार?
कल्याण शिळ रोडवरून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना मानपाडा चौक, पिलर क्र. २०१ येथे प्रवेश बंद.
कल्याण शिळ रोडवरून कल्याणकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना डी.एन.एस. चौक, पिलर क्र. १४४ येथे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग (Diversion Routes)
मानपाडा चौक मार्गावरील वाहतुकीसाठी :
प्रवासी मानपाडा चौक पीलर नं.२०१ येथून डावीकडे वळण घेवून सर्विस रोडने सोनारपाडा चौक पर्यंत येथून पुन्हा उजवीकडे वळण घेवून कल्याण शिळ रोडवरून इच्छीत स्थळी जातील.
डी.एन.एस. चौक मार्गावरील वाहतुकीसाठी :
प्रवासी डी.एन.एस. चौक पीलर नं. १४४ येथून डावीकडे वळण घेवून सर्विस रोडने सुयोग हॉटेल, अनंतम रिजन्सी चौक येथून पुन्हा उजवीकडे वळण घेवून कल्याण रोडवरून इच्छीत स्थळी जाईल.
या मार्गावर पोलिस वाहने, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड आणि इतर आपत्कालीन अत्यावश्यक सेवेसाठी हे निर्बंध लागू नसणार.
अधिकार्यांचे आवाहन
वाहतूक विभागाचे पोलिस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करून संपूर्ण कालावधीत वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. बांधकाम चालू असलेल्या भागात अधिक कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.