कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याच्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संदीप हॉटेल, बिर्ला कॉलेज परिसर, आधारवाडी आणि स्टेशन रोड परिसरात कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने खुलासा केला आहे.
महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या अहवालानुसार, ९ ऑगस्ट रोजी सात तासांत ५८ नागरिकांना कुत्रा चावल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी १७ नागरिकांना संदीप हॉटेल-बिर्ला कॉलेज परिसरात कुत्र्याने चावा घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
कुत्रा चावलेल्या नागरिकांची रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार अँटी-रेबीज व्हॅक्सिन (ARV), इक्वाइन रेबीज इम्युनोग्लोब्युलिन (ERIG) तसेच इतर आवश्यक उपचार करण्यात आले. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना पुढील डोस आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले आहे.
दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत या प्रकरणी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संबंधित परिसरातील संशयित कुत्र्याला पकडण्यात आले असून, भटक्या कुत्र्यांबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित पशुवैद्यकीय विभागाला देण्यात आल्या आहेत.
१३० नव्हे ५८ जणांना कुत्रे चावले
दरम्यान, प्रसिद्ध झालेल्या वृत्तात कल्याणमध्ये सात तासांत १३० जणांना कुत्र्याचा चावा घेतल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयाच्या अधिकृत अहवालानुसार ९ ऑगस्ट रोजी सात तासांत ५८ नागरिकांवर कुत्रा चावल्यामुळे उपचार करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी भटक्या कुत्र्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दोन दिवसांत २५० घटना
कल्याणमध्ये गेल्या दोन दिवसांत २५० हून अधिक कुत्रे चावल्याच्या संशयित घटना समोर आल्या आहेत. यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कुत्रे पकडण्याची मोहीम तीव्र केली असून, चिन्हांकित हॉटस्पॉट्सवर नसबंदी कार्यक्रम वेगाने सुरू केला आहे.
सोमवारी रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली होती. नोंदणी आणि रेबीजविरोधी इंजेक्शनसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रांगेत उभे असल्याचे दिसून आले. नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात रुग्ण आल्याने रुग्णालयावर मोठा ताण आला होता.