मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळल्याने शनिवारी (दि.११) वाहतुकीवर परिणाम झाला. इगतपुरीजवळील जव्हार फाटा परिसरात घडलेल्या या घटनेनंतर रस्त्याखालची माती वाहून गेल्याने रस्त्याचा पाया खचल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासनाने घटनास्थळी बॅरिकेड्स उभारून वाहतुकीचे नियमन सुरू केले असून, वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
जव्हार फाटा परिसरात संरक्षक भिंत कोसळली
इगतपुरी तालुक्यातील जव्हार फाटा परिसरात जुन्या कसारा घाट मार्गावरील संरक्षक भिंत अचानक कोसळली. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये भिंतीचा मलबा रस्त्याच्या एका बाजूला विखुरलेला दिसत असून, काही ठिकाणी रस्त्यावरही भेगा पडल्याचे दिसून आले आहे.
मुसळधार पावसामुळे रस्त्याचा पाया खचला
माध्यमांच्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याखालची माती वाहून गेली. त्यामुळे रस्त्याच्या आधाररचनेचा तसेच संरक्षक भिंतीचा पाया कमकुवत होऊन भिंत कोसळली. यामुळे घाटमार्गावर धोका निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने सुरक्षेची उपाययोजना सुरू केली आहे.
वाहनचालकांना सावधगिरीचा इशारा
घटनेनंतर प्रशासनाने बाधित भागात बॅरिकेड्स उभारून वाहतुकीचे नियमन सुरू केले आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई-पुणे रेल्वे सेवेवरही परिणाम
दरम्यान, ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर लोणावळा-कर्जत घाट विभागात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेने अनेक गाड्या तात्पुरत्या रद्द केल्या असून, तिन्ही मार्गांवरील दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
१७ जुलैपर्यंत काही गाड्या रद्द
मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान आणि प्रतिकूल हवामानामुळे दुरुस्तीच्या कामाला विलंब होत आहे. त्यामुळे काही रेल्वेगाड्या १७ जुलैपर्यंत रद्द राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी NTES ॲप किंवा रेल्वे हेल्पलाइनद्वारे अद्ययावत माहिती तपासावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.