मुंबई : ठाणे–भिवंडी–कल्याण–उल्हासनगर या मेट्रो मार्ग ५ च्या परिचालनासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या कशेळी मेट्रो डेपोचे बांधकाम वेगाने सुरू आहे. जून २०२६ अखेर प्रकल्पाचे २३ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो प्रकल्प टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याच्या धोरणामुळे संपूर्ण डेपो पूर्ण होण्यापूर्वीच मेट्रो गाड्यांची चाचणी, तपासणी आणि प्राथमिक परिचालन सुरू करणे शक्य होणार आहे.
कशेळी टोल प्लाझाजवळ सुमारे २७ हेक्टर क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या या डेपोला ऑगस्ट २०२५ मध्ये पर्यावरणीय मंजुरी मिळाली होती. सुमारे ३२ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्ग ५ वरील सर्व मेट्रो रेक्सचे स्थिरीकरण, देखभाल आणि दीर्घकालीन परिचालनासाठी हा डेपो मुख्य केंद्र म्हणून कार्य करणार आहे. डेपोमध्ये सुमारे ३० मेट्रो रेक्स उभे करण्याची क्षमता, पाच तपासणी मार्गिका, चार कार्यशाळा मार्गिका, स्वतंत्र चाचणी ट्रॅक, शंटिंग सुविधा, डेपो नियंत्रण केंद्र, प्रशासकीय इमारत, कर्मचारी निवास, वीज उपकेंद्र, गाड्यांची धुलाई व स्वच्छता सुविधा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पावसाचे पाणी संकलन व्यवस्था तसेच अत्याधुनिक अग्निसुरक्षा प्रणाली उभारण्यात येणार आहे.
प्रकल्पाच्या जागेवर सहा ते नऊ मीटर खोलीपर्यंत मऊ सागरी चिकणमाती असल्याने आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रगत भू-सुधारणा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सध्या चार मजली डेपो नियंत्रण केंद्राचे बांधकाम सुरू असून अत्यावश्यक कर्मचारी निवासस्थानांच्या पायाभरणीचे कामही प्रगतिपथावर आहे. तसेच २,४०० मिमी आणि २,७५० मिमी व्यासाच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिन्या खाली घेण्याचे काम नोव्हेंबर २०२५ मध्ये पूर्ण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशेळी डेपो हा आधुनिक व विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.
लवकरच चाचणी
मेट्रो मार्ग ५ लवकर सुरू करण्यासाठी कायमस्वरूपी डेपोबरोबरच तात्पुरत्या तपासणी शेड, चाचणी मार्ग, ऑक्झिलरी सबस्टेशन आणि स्वतंत्र शंटिंग सुविधाही विकसित करण्यात येत आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी डेपोचे काम पूर्ण होण्यापूर्वीच रेल्वेगाड्यांची तपासणी, चाचणी आणि कार्यान्वयन शक्य होईल.