पोलीस बंदोबस्तात KDMC रुग्णालयांतील सेवा पूर्ववत; डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजनांचे आश्वासन 
ठाणे

पोलीस बंदोबस्तात KDMC रुग्णालयांतील सेवा पूर्ववत; डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजनांचे आश्वासन

शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना अटक झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) तसेच खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय सेवा गुरुवारपासून पूर्ववत सुरू झाल्या आहेत.

Swapnil S

कल्याण : शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना अटक झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) तसेच खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय सेवा गुरुवारपासून पूर्ववत सुरू झाल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयांच्या प्रवेशद्वारांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सृष्टी बाविस्कर, डॉ. वैभव साळुंके आणि दोन परिचारिकांना मारहाण झाल्यानंतर पालिका रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी दोन दिवस कामबंद आंदोलन केले होते. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनीही कल्याणमधील खासगी रुग्णालये आणि दवाखाने बंद ठेवले होते. बुधवारी सायंकाळी रमेश म्हात्रे यांना अटक झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानंतर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल, वसंत व्हॅली रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना रामोळे, शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सादिया पिंजारी आणि इतर अधिकाऱ्यांनी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. या बैठकीत शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई आणि वसंत व्हॅली रुग्णालयांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, कायमस्वरूपी पोलीस चौकी, समुपदेशकांची नियुक्ती, सुरक्षारक्षकांची संख्या वाढविणे तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

काम बंदच्या भूमिकेवर ठाम

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील १४ कंत्राटी डॉक्टरांसह परिचारिका व कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असून, सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत कामावर न परतण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. डॉ. सृष्टी बाविस्कर यांच्या कुटुंबीयांनीही सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

डॉक्टरांचे ठाण्यातही आंदोलन

ठाणे : डोंबिवलीतील महिला डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना छातीत दुखत असल्याची तक्रार झाल्याने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केले. डॉक्टरांवरील हल्ले बंद करा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या, अशा घोषणाबाजी करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पावसाळी आजाराचे थैमान! रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ; मुंबईत साथीचे आजार बळावले

Mumbai : मूकबधिर महिलेला हायकोर्टाचा दिलासा; दोन वर्षांनंतर जामिनावर सोडण्याचे आदेश

धरणातील पाणीसाठा वाढू लागला; मुंबईकरांना काहीसा दिलासा काहीसा दिलासा

महापौरांकडून दुजाभाव; किशोरी पेडणेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

गेमिंग झोनच्या सुरक्षा निकषांचा आढावा घेणार; विधान परिषदेत मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन