ठाणे

उल्हासनगरसह KDMC मध्ये पाणी कपातीचा निर्णय; MIDC कडून पाणीपुरवठा बंदीचे वेळापत्रक जारी

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, आवश्यक तेवढाच साठा करून ठेवावा तसेच उद्योगांनीही उत्पादन व वापर याचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Krantee V. Kale

उन्हाळ्याच्या कडाक्याच्या पार्श्वभूमीवर आणि पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, एमआयडीसी कडून पाणी कपातीचा मोठा निर्णय जाहीर झाला आहे. बारवी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा दोन टप्प्यांत २४-२४ तास बंद राहणार असल्याने उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीसह औद्योगिक पट्ट्यात पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे.

अलनिनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे यंदाचा पावसाळा उशिरा येण्याची शक्यता व्यक्त होत असताना संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) नियोजित पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा विभागासोबत झालेल्या बैठकीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जांभुळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा दोन टप्प्यांत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

'या' कालावधीत २४ तास पाणीपुरवठा बंद

पहिला टप्पा गुरुवार दि. ७ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होऊन शुक्रवार दि. ८ मे २०२६ दुपारी १२ वाजेपर्यंत राहणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा गुरुवार दि. २१ मे २०२६ दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवार दि. २२ मे २०२६ दुपारी १२ वाजेपर्यंत असेल. या दोन्ही कालावधीत सलग २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

कोणाला फटका?

या पाणी कपातीचा फटका उल्हासनगर महापालिका, डोंबिवली आणि तळोजा औद्योगिक क्षेत्रांसह कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि परिसरातील विविध ग्रामपंचायतींना बसणार आहे. विशेष म्हणजे, पाणीपुरवठा बंदीनंतरच्या पुढील दिवशी म्हणजेच ९ मे आणि २३ मे रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, आवश्यक तेवढाच साठा करून ठेवावा तसेच उद्योगांनीही उत्पादन व वापर याचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता आर. जी. राठोड यांनी जारी केलेल्या या सूचनेमुळे आगामी काळात पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले असून, नागरिकांनीही या परिस्थितीत सहकार्य करणे अपेक्षित आहे.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार