बदलापूर : अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून बदलापुरात पाच दिवसांपासून सुरू असलेल्या श्रीराम महोत्सवाची सोमवारी सांगता होत आहे. यानिमित्ताने होणाऱ्या दीपोत्सव व रॅलीची तसेच महाआरतीची जय्यत तयारी करण्यात आली. उल्हास नदीकिनाऱ्यावर होणाऱ्या या महाआरतीत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अंबरनाथ तालुका आध्यात्मिक उत्सव समिती आणि आमदार किसन कथोरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूर पूर्वेकडील गांधी चौकातील मराठी शाळेच्या पटांगणात श्रीराम महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. शहरातील अनेक संस्था या उत्सवात सहभागी झाल्या आहेत. याठिकाणी अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली. दररोज संध्याकाळी ५ ते ९ दरम्यान भजन आणि श्रीरामगीतांचे कार्यक्रम होत आहेत. प्रभू श्रीराम यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रांचे प्रदर्शनही याठिकाणी मांडण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी तसेच प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती व चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. १७ जानेवारीपासून सुरू असलेल्या या पाच दिवसीय श्रीराम महोत्सवाची सोमवारी (दि.२२) रोजी महाआरतीने सांगता होणार आहे. उल्हास नदीकिनाऱ्यावर आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते ही महाआरती होणार आहे. तत्पूर्वी शहरात भव्य रॅली काढण्यात येणार आहे. ढोल-ताशे, बँड पथक, चित्र रथ, प्रभू श्रीरामाची मूर्ती असलेला रथ असे या मिरवणुकीचे स्वरूप असणार आहे. बदलापूर पूर्वेतून ही मिरवणूक सुरू होऊन पुढे बाजारपेठेतून येऊन उल्हास नदीकिनारी पोहोचेल. त्यानंतर उल्हास नदीवर महाआरती होईल. उल्हास नदीकिनारी होणारी ही महाआरती बदलापुरातील ऐतिहासिक आरती असेल. यात हजारो श्री रामभक्त आणि नागरिकांनी उत्साहात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे.
कंदील, पताकांनी सजली बदलापूर नगरी
अयोध्येत होत असलेल्या भव्य राममंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने अवघी बदलापूर नगरी भगव्या कंदील आणि पताकांनी सजली आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहराच्या भागाभागात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. रस्ते धुवून स्वच्छ केले जात आहेत. त्यामुळे अवघी बदलापूर नगरी प्रभू श्रीरामाच्या भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दीपोत्सवासाठी २ लाख ५१ हजार दिवे
श्री राम मंदिराच्या लोकार्पण दिनी देशभरात दिवाळी आणि दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यानुसार आमदार किसन कथोरे यांनी संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांनी सोमवार, २२ जानेवारीला घरोघरी दीपोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले आहे. त्यासाठी २ लाख ५१ हजार सुबक नक्षीदार दिवे घरोघरी वाटले आहेत. मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत हा दिवा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे कथोरे यांनी सांगितले आहे.
ठाण्यातील साईबाबा मंदिरात २५ टन लाडू तयार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम प्रभूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या अनुषंगाने ठाणे शहर संपूर्ण रामायण झाल्याचे चित्र असताना रामसेवक माजी खासदार डॉ. संजीव नाईक आणि रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्याच्या वर्तक नगर येथील साईबाबा मंदिरात २५ टन लाडू तयार करण्यात आले आहेत. हे सगळे लाडू ठाणे जिल्हा व नवी मुंबई परिसरातील नागरिकांना व सर्व मंडळ व मंदिरांमध्ये वाटप करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील, रुद्र प्रतिष्ठानचे संस्थापक धनंजय सिंग सिसोदिया वर्तक नगर साईनाथ सेवा समितीचे सदस्य आदींच्या उपस्थितीत या लाडू वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.