ठाणे : ठाणे जिल्ह्यातील बंडखोरी शमवण्यामध्ये महायुतीच्या नेत्यांना यश न आल्याने कल्याण, भिवंडी आणि नवी मुंबईत महायुतीमध्ये बंडखोरी कायम राहिली आहे. निवडणुकीत बंडखोरांचे आव्हान कायम असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. तर बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना काही प्रमाणात यश आल्याने महाविकास आघाडीला मात्र काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ असून सोमवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. सोमवारी अर्ज मागे न घेतल्याने अनेक बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये सर्वाधिक बंडखोरी महायुतीच्या उमदेवारांच्या विरोधात कायम राहिली आहे. भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पक्षाचे रईस शेख हे विद्यमान आमदार असून त्यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. या ठिकाणी बंडखोरी झाली नाही, मात्र समाजवादी पक्षाने भिवंडी पश्चिममध्ये रियाज आझमी यांना उभे केले आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेसचे दयानंद चोरगे यांना उमेदवारी दिली असताना काँग्रेसचे बंडखोर विलास पाटील रिंगणात आहेत. तर भिवंडी पूर्वमध्ये माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी शमली आहे. या ठिकाणी भाजपचे संतोष शेट्टी यांना शिंदेंच्या शिवसेनेने आपल्या पक्षात घेत उमेदवारी दिली आहे.
भिवंडी ग्रामीणमध्ये विद्यमान आमदार शांताराम मोरे हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे महादेव घाटाळ रिंगणात आहेत. भाजपच्या स्नेहा पाटील यांची या ठिकाणी बंडखोरी कायम आहे.
कल्याण पूर्वमध्ये महायुतीच्या सुलभा गायकवाड, महाविकास आघाडीचे धनंजय बोडारे, तर शिंदे गटाचे बंडखोर महेश गायकवाड आणि काँग्रेसचे बंडखोर सचिन पोटे यांनी अर्ज दाखल केले होते. सचिन पोटे यांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी शिंदेंच्या शिवसेनेचे महेश गायकवाड यांनी बंड कायम ठेवले आहे. कल्याण पश्चिममध्ये महायुतीचे विश्वनाथ भोईर, महाविकास आघाडीचे सचिन बासरे, तर भाजपचे बंडखोर नरेंद्र पवार आणि वरूण पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. नरेंद्र पवार यांनी अर्ज मागे घेतला असला तरी भाजपचे वरूण पाटील रिंगणात आहेत. त्यांनी बंडाचे निशाण कायम ठेवले आहे. मनसेचे उल्हास भोईरही या ठिकाणी रिंगणात आहेत. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे सेनेचे राजेश वानखडे यांना रिंगणात उतरवले असून या ठिकाणी काँग्रेसचे सुमेध भावर यांनी बंड केले आहे. या मतदारसंघात महायुतीचे डॉ. बालाजी किणीकर रिंगणात आहेत. शहापूरमध्ये पारंपरिक लढत होत असून विद्यमान आमदार दौलत दरोडा हे महायुतीचे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीचे पांडुरंग बरोरा हे उमेदवार आहेत. लोकसभेला या मतदारसंघात निलेश सांबरे यांना मताधिक्य मिळाले होते. जिजाऊ संघटनेने रंजना काळुराम उघडा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणीही तिरंगी लढत आहे. मुरबाड हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार किसन कथोरे रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून सुभाष पवार रिंगणात आहेत. त्यामुळे या ठिकाणी दुरंगी लढत कायम आहे. ओवळा माजिवडा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात महाविकास आघाडीने नरेश मणेरा यांना, तर मनसेने संदीप पाचंगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे इथे तिरंगी लढत आहे. डोंबिवलीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण विरुद्ध दीपेश म्हात्रे अशी दुरंगी लढत आहे. कळवा-मुंब्रा मतदारसंघात महाविकास आघाडीचे जितेंद्र आव्हाड विरुद्ध महायुतीचे नजीब मुल्ला आणि मनसेचे सुशांत सूर्यराव यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे सुभाष भोईर, शिंदेंच्या शिवसेनेचे संजय मोरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
ठाणे जिल्ह्यात २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ३८१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एकूण ३३४ उमेदवारांचे अर्ज वैध, तर ४७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. वैध ठरलेल्या ३३४ उमेदवारांपैकी सोमवारी एकूण ९० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
कोपरी पाचपाखाडीत मविआत बंडखोरी कायम...
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी कायम ठेवली आहे.
नवी मुंबईत बंडखोरांची माघार नाही!
ठाणे जिल्ह्यातील ऐरोली आणि बेलापूर हे मतदारसंघ नवी मुंबई महापालिका क्षेत्रात येतात. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक हे पुन्हा एकदा महायुतीकडून ऐरोली मतदारसंघातून लढत आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे विजय चौघुले यांनी बंडखोरी कायम ठेवत आव्हान दिले आहे. तर महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात एम के मढवी यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. तर बेलापूर मतदारसंघात मंदा म्हात्रे या महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर अपक्ष म्हणून विजय नाहाटा यांची बंडखोरी कायम आहे.
कल्याण पश्चिममधून सहा उमेदवारांची माघार
डोंबिवली : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण ३० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्याकडे सादर केले होते. सोमवार ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
अरविंद बाळकृष्ण मोरे (अपक्ष), मोनिका मोहन पानवे (अपक्ष), नरेंद्र वामन मोरे (अपक्ष), राजकुमार दत्तात्रय पातकर (अपक्ष), अश्विनी प्रताप मोकासे (अपक्ष), नरेंद्र बाबुराव पवार (अपक्ष) अशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे आहेत. तर अनिल राजमणी द्विवेदी (राईट टू रिकॉल पार्टी), रजनी अरुण देवळेकर (समता पार्टी), संदिप महादेव नाईक (नाईक बाबा) - (निर्भय महाराष्ट्र पार्टी), उल्हास महादेव भोईर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना ), गुरुनाथ गोविंद म्हात्रे ( अपक्ष), अय्याज गुलजार मौलवी - वंचित बहुजन आघाडी, निलेश रतनचंद जैन (अपक्ष ), डॉ. विजय भिका पगारे (अपक्ष), विश्वनाथ आत्माराम भोईर (शिवसेना), सुनिल सिताराम उतेकर (अपक्ष), सुरेश काळुराम जाधव (अपक्ष), जयपाल शिवराम कांबळे (अपक्ष), ऐलान लतिक बरमावाला (अपक्ष), वरुण सदाशिव पाटील (अपक्ष), सचिन दिलीप बासरे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), अनिल आत्माराम पाटील (अपक्ष), कौस्तुभ सतिशचंद्र बहुलेकर (अपक्ष), कपिल राजाभाऊ सुर्यवंशी (अपक्ष), अमित राहुल गायकवाड (अपक्ष), ममता दीपक वानखेडे (बहुजन समाज पार्टी), राकेश अमृतलाल मुथा (अपक्ष), पंचशिला भुजंगराव खडसे (अपक्ष), पंडागळे सुरेश राम (अपक्ष), निसार अब्दुल रेहमान शेख (अपक्ष) अशी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात उभे असलेल्या उमेदवारांची नावे आहेत.
उल्हासनगरमध्ये भरत गंगोत्री यांची बंडखोरी कायम
उल्हासनगर : उल्हासनगर मतदारसंघातून तब्बल २६ उमेदवारांनी आपले अर्ज भरले होते. त्यातील ७ उमेदवारांनी सोमवारी माघार घेतल्याने आता १९ उमेदवारांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे महायुतीतील नेते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भरत गंगोत्री यांनी बंडखोरी कायम ठेवत उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघातील रंगत वाढलेली आहे. माघार घेणाऱ्या पाच उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार ओमी कलानी यांना समर्थन दिले आहे. या पाच उमेदवारांमध्ये बहुजन समाज पक्षाचे अब्दुल शेख, अपक्ष मनोज सयानी (लासी), पंचम कलानी, इब्राहिम अन्सारी आणि मोहोम्मद शहाबुद्दीन शेख यांचा समावेश आहे. उल्हासनगर विधानसभा निवडणुकीत यंदा मुख्य लढत भाजपचे कुमार आयलानी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ओमी कलानी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भगवान भालेराव, वंचित बहुजन आघाडीचे संजय गुप्ता आणि महायुतीतील बंडखोर अपक्ष उमेदवार भरत गंगोत्री यांच्यात होणार आहे. १९ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असून त्यात ३ राष्ट्रीय पक्षांचे, ६ नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार आणि १० अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
डोंबिवलीतून जरांगे-पाटील यांच्या उमेदवाराची माघार
राज्यातील विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सुरुवातीला आपले उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले होते. त्यांच्या आदेशानुसार डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून मराठा समाजाकडून गणेश कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर जरांगे - पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. त्यानुसार गणेश कदम यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
वसईतून ७, तर नालासोपारातून १२ उमेदवार रिंगणात
वसई : वसई, नालासोपारा मतदारसंघातून १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले आहे. यात वसईतून ७ व नालासोपाऱ्यातून १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक लढविण्यासाठी पात्र ठरलेल्या ८ उमेदवारांनी माघार घेतली. विशेषतः बंडखोरी केलेले शिवसेनेचे विनायक निकम यांनी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीतील फूट टळली आहे. विविध उमेदवार रिंगणात असले तरी वसईतील खरा सामना बविआ, महायुती आणि महाविकास आघाडी असा तिरंगी होणार असून, नालासोपाऱ्यात बविआ आणि महायुती अशी दुहेरी झुंज पाहायला मिळणार आहे. वसईतून १५ उमेवारांनी २७ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी पाच उमेवारांचे ७ अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान बाद ठरविले होते. तर सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४ उमेदवारांनी ६ अर्ज मागे घेतले त्यामुळे सात उमेदवार वसईतून रिंगणात आहेत. यात महाविकास आघाडीचे विजय पाटील, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, महायुतीच्या स्नेहा दुबे आणि अपक्ष म्हणून रुग्णमित्र राजेंद्र ढगे, प्रल्हाद राणा, गॉडफ्री अलमेडा व विनोद तांबे हे निवडणूक लढविणार आहेत. नालासोपारा मतदारसंघातून १६ उमेदवारांनी २४ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक अर्ज बाद झाला, तर ४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
मीरा-भाईंदरमध्ये ५ बंडखोरांच्या तलवारी म्यान
भाईंदर : मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून २३ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी भाजपच्या ३, तर मविआच्या दोन बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे. एकूण ६ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली असून १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. १४५ मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे मुजफ्फर हुसेन, महायुतीकडून भाजपचे नरेंद्र मेहता, अपक्ष आमदार गीता जैन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण कदम, मनसेचे संदीप राणे, भाजपचे हंसुकुमार पांडे आदी उमेदवार रिंगणात आहेत. भाजपमधून बंडखोरी करत सुरेश खंडेलवाल, चंद्रकांत मोदी, एजाज खातिब यांनी अर्ज दाखल केले होते. तर नरेंद्र मेहता यांच्या पत्नी सुमन मेहता यांनीही अर्ज दाखल केला होता. या चौघांनीही अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रमजान खत्री व बहुजन विकास आघाडीच्या फ्रीडा प्रदिप मोराएस या दोघांनी सोमवारी उमेदवारी मागे घेतले आहेत.