महापालिकांच्या रणधुमाळीला सुरुवात 
ठाणे

महापालिकांच्या रणधुमाळीला सुरुवात; 'झिरो एरर' तयारी, कडक बंदोबस्तात निवडणूक प्रक्रियेला वेग

राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केल्यानंतर नवी मुंबई, उल्हासनगर आणि भिवंडी या तिन्ही महापालिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, प्रशासकीय यंत्रणेची ‘झिरो एरर’ तयारी, स्ट्राँगरूम व निवडणूक कार्यालयांची तपासणी तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त यामुळे निवडणूक रणधुमाळीला औपचारिक सुरुवात झाली आहे.

Swapnil S

राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केल्यानंतर नवी मुंबई, उल्हासनगर आणि भिवंडी या तिन्ही महापालिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, प्रशासकीय यंत्रणेची ‘झिरो एरर’ तयारी, स्ट्राँगरूम व निवडणूक कार्यालयांची तपासणी, तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त यामुळे निवडणूक रणधुमाळीला औपचारिक सुरुवात झाली आहे. शांततापूर्ण, पारदर्शक आणि लोकशाही मूल्यांना अनुसरून निवडणूक पार पाडण्याचा निर्धार तिन्ही महापालिका प्रशासनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

उल्हासनगरमध्ये ‘झिरो एरर’ निवडणुकीचा निर्धार; आयुक्त मनिषा आव्हाळेंचे स्पष्ट निर्देश

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी प्रशासनाने ‘झिरो एरर’चा ठाम निर्धार केला असून, निवडणूक यंत्रणा पूर्णतः सज्ज करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून तयारीचा कस लावण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया कोणत्याही त्रुटीविना, पारदर्शक व लोकशाही मूल्यांना अनुसरून पार पडावी, यासाठी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी शहरातील विविध निवडणूक कार्यालयांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला ठोस व स्पष्ट निर्देश दिले.

उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने निवडणूक कामकाजाचा सखोल आढावा घेण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्यासमवेत शहरातील विविध निवडणूक संबंधित कार्यालयांना भेटी दिल्या. या पाहणी दौऱ्यात गोल मैदान येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, सिंधु भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्रमांक १४, तसेच तहसीलदार कार्यालय व प्रांत कार्यालय यांचा समावेश होता. प्रत्येक ठिकाणी निवडणूक प्रक्रियेसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांची बारकाईने तपासणी करण्यात आली.

तसेच पवई चौक, उल्हासनगर-३ येथील प्रांत कार्यालयात उभारण्यात येत असलेल्या स्ट्राँगरूमचीही आयुक्तांनी पाहणी केली. सदर स्ट्राँगरूमचे काम तातडीने पूर्ण करून निर्धारित कालावधीत निवडणूक वापरासाठी पूर्णतः सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले. निवडणूक कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परस्पर समन्वय साधून कामकाज करावे, तसेच निवडणूक प्रक्रिया शांतता, पारदर्शकता व लोकशाही मूल्ये जपत पार पाडावी, असे स्पष्ट निर्देशही यावेळी देण्यात आले.

भिवंडीत राजवटीचा काळ संपणार; महापालिका निवडणुकीनंतर महापौर पदभार स्वीकारणार

सुमित घरत/भिवंडी

२०२६ मधील भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगूल वाजले असून, लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील राजकीय मैत्री बाजूला सारत ‘मैत्रीपूर्ण लढत’ या नावाखाली नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेतून मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षांपासून रिकामी असलेली भिवंडी महापालिकेतील महापौर पदाची खुर्ची अखेर २०२६ मध्ये भरली जाणार आहे. त्यामुळे भिवंडी महापालिकेच्या स्थापनेपासून होणाऱ्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत महापौर पद पुन्हा कार्यरत होणार असून, तीन वर्षांची प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे. यामुळे भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास शहरातील सजग नागरिकांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ डिसेंबर २००१ रोजी भिवंडी निजामपूर नगरपालिकेचे रूपांतर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत झाले. त्यानंतर मे २००२ मध्ये पहिली महापालिका निवडणूक पार पडली. त्या वेळी काँग्रेसचे सुरेश टावरे यांना प्रथम महापौर होण्याचा मान मिळाला. त्यांनी १३ जून २००२ ते १७ फेब्रुवारी २००५ या कालावधीत महापौर पदाचा कार्यभार सांभाळला.

यानंतर १८ फेब्रुवारी २००५ ते १२ जून २००७ या अडीच वर्षांच्या कालावधीत कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांनी महापौर पद भूषवले. त्यानंतर १३ जून २००७ ते १४ डिसेंबर २००९ या कालावधीत काँग्रेसचे जावेद गुलाम मो. दळवी यांनी महापौरपदाची जबाबदारी सांभाळली.

काँग्रेस-शिवसेना युतीला धक्का

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे १८ नगरसेवक फुटल्याने भाजप-कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील या महापौरपदी विजयी झाल्या होत्या. तर उपमहापौरपदी कोणार्क पुरस्कृत काँग्रेसचे नगरसेवक इम्रान खान निवडून आले होते. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस-शिवसेना युतीला मोठा धक्का बसला होता.

महापालिका निवडणुकीसाठी नवी मुंबई सज्ज

नवी मुंबई : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी निवडणूक विषयक विविध कामांकरिता नवी मुंबई महानगरपालिकेतील विभागप्रमुख दर्जाचे समन्वय अधिकारी

(नोडल ऑफिसर) नियुक्त केले आहेत.

निवडणूक काळात पारदर्शकता व शांतता अबाधित राहण्यासाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता हा अतिशय महत्त्वाचा विषय असून, त्याकरिता आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात येऊन त्याचे सनियंत्रण अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त (१) सुनील पवार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या कक्षामार्फत आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याबाबत निरीक्षण व नियंत्रण तसेच याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी व निवेदनांवर नियमोचित कार्यवाही करण्यात येत आहे.

आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने नागरिकांना आपल्या तक्रारी व आक्षेप दाखल करता यावेत, यासाठी संपर्कध्वनी क्रमांक जाहीर करण्यात येत असून खालीलप्रमाणे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (२) यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात येत आहेत.

पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून, प्रलंबित समन्स व वॉरंट बजावणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच ॲट्रॉसिटी स्वरूपाचे गुन्हे व मागील निवडणुकांतील संवेदनशील घटनांचा आढावा घेऊन संबंधित भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्णतः शांत, निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पडावी, यासाठी नवी मुंबई पोलीस प्रशासन सर्वसमावेशक उपाययोजना राबवत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
योगेश गावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखा

अँटी ड्रॅग स्कॉड, भरारी पथक

नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ शांत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त व व्यापक कारवाई आराखडा अमलात आणला आहे. यासाठी तीन मनाई आदेश जारी करण्यात आले असून ते १८ जानेवारी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या सभा, पदयात्रा, रोड शो व चौक सभांसाठी मार्ग, वेळ व ठिकाणाबाबत पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे. ध्वनीक्षेपकांच्या वापरास वेळ व आवाज मर्यादा निश्चित करण्यात आल्या असून, नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ कारवाई केली जाणार आहे.

"...तर महिलांना कोणी नोकरी देणार नाही"; मासिक पाळी रजेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Maharashtra Weather : हवामान खात्याचा अंदाज; राज्यात चार दिवस वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

अजित पवारांच्या अपघातातील सत्य सांगा! राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांची मागणी

ST डेपोच्या विकासासाठी भाडेकराराला ९८ वर्षांपर्यंत वाढ; सरकारकडे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी दाखल