उल्हासनगर : उल्हासनगरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये आता माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे अनिवार्य ठरणार आहे. राज्य शासनाच्या नव्या आदेशानुसार शाळेच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक मजबूत करण्यासाठी आणि शैक्षणिक तसेच भौतिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागाने सर्व शाळांना तातडीने संघ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळेच्या घडणीमुळे मोठ्या पदांवर आणि विविध क्षेत्रांत झळकणारे असंख्य माजी विद्यार्थी आता पुन्हा आपल्या शाळेशी अधिक दृढ नात्याने जोडले जाणार आहेत.
उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शहरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचे आदेश जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागाने सर्व शाळांना निर्देश दिले आहेत की, इयत्ता १ ते १२ या एकत्रित स्तरावर माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून माजी विद्यार्थी संघ स्थापन करावा आणि त्याचा अहवाल तातडीने शिक्षण विभागाकडे सादर करावा.
माजी विद्यार्थी संघाकडून अपेक्षित योगदान
शाळेतील भौतिक व पूरक सुविधा विकसित करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य.
शैक्षणिक दर्जा, विद्यार्थी गुणवत्ता व कौशल्यविकासासाठी सहकार्य.
पालकांमध्ये शाळेचे महत्त्व आणि भावनिक नाते दृढ करणे.
आर्थिक पारदर्शकतेसाठी रोख रक्कम न स्वीकारता आवश्यक सुविधा/वस्तुरूप मदत देण्यावर भर.
शाळा-विद्यार्थी घडणीची प्रथम पायरी
शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण घडणीची प्रथम पायरी आहे. शाळेतील ज्ञान, संस्कार आणि मूल्यांमुळे तयार झालेली पिढी आज प्रशासन, राजकारण, शेती अशा विविध क्षेत्रांत राज्यभर उत्तुंग स्थान मिळवताना दिसते. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अहमदनगर अशा अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या योगदानात भर दिला आहे.
ज्या शाळांनी आधीच माजी विद्यार्थी संघ स्थापन केला आहे, त्यांनी त्याची सविस्तर माहिती स्वतंत्र लिंकवर तातडीने भरावी. ज्यांनी अद्याप संघ स्थापन केला नाही, त्यांनी तातडीने संघ स्थापन करून कार्यवाही सुरू करावी. या निर्णयामुळे उल्हासनगरातील हजारो माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेशी पुन्हा एकत्र येण्याची आणि शाळेच्या उभारणीत थेट योगदान देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. शाळा-माजी विद्यार्थी संबंधांचा नवा अध्याय आता सुरू होणार आहे.दीपक धनगर, प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग