ठाणे

माथेरानमध्ये पर्यटकांची उत्साही गर्दी; शार्लोट धबधब्याचा आनंद घेण्याकडे पर्यटकांचा कल

जानेवारीनंतर प्रथमच माथेरानमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. गेले दोन दिवस विशेषतः शनिवार व रविवारच्या सुट्टीचा लाभ घेत अनेक पर्यटकांनी माथेरानकडे धाव घेतली.

Swapnil S

चंद्रकांत सुतार/माथेरान

जानेवारीनंतर प्रथमच माथेरानमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. गेले दोन दिवस विशेषतः शनिवार व रविवारच्या सुट्टीचा लाभ घेत अनेक पर्यटकांनी माथेरानकडे धाव घेतली. त्यामुळे येथील स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हॉटेल्स, कॉटेजेस, लॉजेस फुल्ल क्षमतेने भरले गेले.

गेल्या दोन दिवसांत अचानक वाढलेल्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण आला होता. दस्तुरीपासून पुढे चालत जावे लागले. काही पर्यटकांना राहण्याची व्यवस्था न मिळाल्याने माघारी फिरावे लागले. काहींना पावसात भिजण्याचा आनंद लुटायचा होता, मात्र पावसाची प्रतीक्षा निराशाजनक ठरली. तरीही, शार्लोट धबधब्याचा आनंद पर्यटकांनी मनमुराद घेतला. रविवारी सायंकाळी सहानंतर मात्र माथेरान पुन्हा शांत झालं. दोन दिवसांनी आपल्याला गोडवा देऊन मध गोळा करणाऱ्या मधमाशांसारखे हे पर्यटक परतीच्या वाटेला लागले. त्या गजबजाटानंतर आलेली ही शांतता माथेरानकरांना ‘चुकल्यासारखी’ वाटली.

शहराच्या गोंगाटातून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी माथेरान हे पर्यटकांचे आवडते ठिकाण ठरत आहे. येत्या आठवड्यांत अधिक पावसाची शक्यता असल्याने पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास स्थानिक व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

पर्यटन व्यवसायाला चालना

हॉटेल व्यवसाय, हातगाडी अश्वचालक विक्रेते, स्थानिक दुकानदार, रिक्षाचालक आदींसाठी ही गर्दी आश्वासक ठरली. पावसाळा आणि वीकेंड टुरिझमच्या सुरुवातीला आलेल्या या गर्दीमुळे पुढील आठवड्यांतही पर्यटनवाढीची अपेक्षा आहे.

ई-रिक्षा व मिनी ट्रेनचा पर्यटकांना लाभ

शटल सेवामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला, तसेच ई-रिक्षा आणि मिनी ट्रेनचा पर्यटकांना लाभ झाल्याने परिसरात फिरणे सुलभ झाले आहे.

किचन बजेट बिघडणार! घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागला; नवे दर आजपासून लागू

T20 Final साठी रेल्वेची खास सोय; मुंबई-पुण्याहून अहमदाबादसाठी स्पेशल ट्रेन, वाचा वेळापत्रक

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; वाचा संपूर्ण वेळापत्रक

अटल सेतू परिसरात तिसरी, तर पालघरमध्ये चौथी मुंबई वसवणार; मुंबईसह पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रो विस्तारणार- मुख्यमंत्री

महाबळेश्वरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; वन विभागाने केली सात जणांना अटक