ठाणे : आपल्याशी असंबंधित प्रकरणांमध्ये नाव गोवून पक्षनेतृत्वाला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेठीस धरण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत शिंदेसेनेच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मीनाक्षी शिंदे यांनी आपला राजीनामा पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला असून, माझ्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण पदापासून दूर राहत आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला असतानाच ठाकरे गट, सर्वपक्षीय कृती समिती आणि पूर्णेकर कुटुंबीयांकडून सुरू असलेल्या तीव्र आंदोलनांमुळे शिंदेसेनेची मोठी कोंडी झाली आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर पत्रकार परिषदेत मीनाक्षी शिंदे यांनी पदावरून बाजूला व्हावे, असा सूचक सल्ला दिल्यानंतर अवघ्या २४ तासांत हा राजीनामा पुढे आला आहे.
आरोप-प्रत्यारोपांमुळे व्यथित
प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर आणि राजकीय वतुर्ळात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे व्यथित झाल्याचे मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. पक्षाची प्रतिष्ठा आणि नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुर्णेकर कुटुबियांची अटकेची मागणी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर पुर्णेकर कुटुबियांनी मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांना अटक व्हावी, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीदेखील लावून धरली आहे. अखेर पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला नाही, परंतु २९ दिवसानंतर मीनाक्षी शिंदे यांनी स्वत: आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी पाऊल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २९ ऑक्टोबर रोजी पाठविलेल्या पत्रातून मीनाक्षी शिंदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘विविध पक्षांकडून एकत्रितपणे आपल्यावर आरोप करून पक्षनेतृत्वावर दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घडामोडींमुळे मनाला प्रचंड वेदना होत असून, ज्या नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी आजवर काम केले, त्याच नेतृत्वाच्या बदनामीचे कारण आपल्यामुळे ठरावे, हे सहन होत नाही,’ असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
नाराजीपेक्षा नेतृत्वाच्या प्रतिष्ठेला प्राधान्य
‘आजवर संपूर्ण निष्ठेने पक्षाचे काम केले असून, पक्षाला किंवा नेतृत्वाला मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही कृत्य केलेले नाही. ज्या प्रकरणांशी आपला काहीही संबंध नाही, त्यामध्ये नाव जोडून पक्षावर दबाव आणला जात आहे. आपल्या निष्ठेची आणि कार्याची पावती आरोपांच्या माध्यमातून दिली जात असल्याची भावना मनाला बोचत आहे,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मास्टरमाइंडला अटक कधी करणार - आदित्य ठाकरे
पुर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कथित मास्टरमाइंडला अटक कधी होणार? संबंधित व्यक्तींना वाचवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर केला जात आहे का? असे प्रश्न उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. राजीनामा हा मुख्य मुद्दा नसून प्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोहोचला आणि आरोपींना अटक कधी होणार, हे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
राजकारण करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही -शिंदे
पूर्णेकर यांची हत्या अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या घटनेची पहिल्याच दिवशी गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्तांना निःपक्षपाती चौकशीचे कडक आदेश दिले होते. पोलिसांनी तत्काळ आरोपींना बेड्या ठोकून शस्त्रे जप्त केली आहेत. मात्र, एका कुटुंबावर कोसळलेल्या दुःखावर स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा आणि ठाणेकरांना वेठीस धरण्याचा जो कुटील डाव विरोधकांकडून सुरू आहे, तो अत्यंत लाजीरवाणा आहे. ठाण्याबाहेरून येऊन काही राजकीय मंडळी आंदोलने करत आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.