भाईंंदर : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांमध्ये जुंपल्याच्या दै. ‘नवशक्ति’च्या बातमीनंतर वादावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठांनी २ महिन्यात परत आलेल्या तिघा अधिकाऱ्यांची इच्छापूर्ती करत पूर्वीच्या पोलीस ठाण्यात नियुक्ती केली आहे. २ पोलीस ठाण्यातील प्रभारी यांची अन्य पोलीस ठाण्यात वपोनि म्हणून नियुक्ती करतानाच १० पोलीस ठाण्यातील प्रभारींना देखील वपोनि करत शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
विधानसभा निवडणुकी वेळी निवडणूक आयोगाच्या दट्ट्यानंतर मीरा- भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील ३८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ३० ऑक्टोबर रोजी करण्यात आल्या होत्या. मात्र काही अधिकाऱ्यांनी या बदल्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत मॅटमध्ये धाव घेतली.
मुंबई आदी भागातून बदली होऊन आलेल्या पोलीस निरीक्षकांची ४ नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात नियुक्ती करताना ती तात्पुरती स्वरूपात करण्यात आली. केवळ तुळींज पोलीस ठाण्याचा अपवाद वगळता अन्य अधिकाऱ्यांचा पोलीस ठाणे प्रभारी म्हणून उल्लेख नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत होते. दरम्यान ३१ डिसेंबर रोजी मीरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयातून बदली केलेल्यांपैकी संजय हजारे, जितेंद्र वनकोटी, राजेंद्र कांबळे, चंद्रकांत सरोदे, विलास सुपे, दिलीप राख व सुधीर गवळी या ७ पोलीस निरीक्षकांची पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत दोन महिन्यांतच घरवापसी करण्यात आली आहे. ९ जानेवारी रोजी हे अधिकारी मीरा- भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयात हजर झाले असता त्यांची नियुक्ती प्रलंबित असल्याचे दिसून आले. याप्रकरणी १५ पोलीस ठाण्यांचे प्रभारी निरीक्षकांनी त्या ७ अधिकाऱ्यांविरोधात मॅटमध्ये धाव घेतली.
काशिमीरा पोलीस ठाण्याचे प्रभारी असलेले लालू तुरे यांना विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तर मांडवीचे प्रकाश कावळे यांना बोळींज वपोनि म्हणून नेमत एकप्रकारे समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. तर मीरारोड पोलीस ठाण्याच्या मेघना बुरांडे, काशीगावचे महेश तोगरवाड, नया नगरचे अमर जगदाळे, उत्तनचे शिवाजी नाईक, नायगावचे विजय कदम, माणिकपूरचे हरिलाल जाधव, वालिवचे दिलीप घुगे, आचोळेचे सुजितकुमार पवार, नालासोपाराचे विशाल वळवी व वसई पोलीस ठाण्याचे बाळकृष्ण घाडीगावकर यांना आता वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी त्याच पोलीस ठाण्यात कायम ठेवण्यात आले आहे.
या अधिकाऱ्यांना लॉटरी
१३ जानेवारी रोजी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी बदल्या व नियुक्त्यांचे आदेश जारी केले. त्यात संजय हजारे यांना मांडवी, जितेंद्र वनकोटी यांना पेल्हार, तर राजेंद्र कांबळे यांना काशिमीरा अशा त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणीच वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. या तीन वजनदार अधिकाऱ्यांची वरिष्ठांनी इच्छापूर्ती केली असली तरी विलास सुपे यांना मात्र आर्थिक गुन्हे शाखेत, तर चंद्रकांत सरोदे यांना चक्क नियंत्रण कक्षात वपोनि पदी नियुक्ती करण्यात आली आहे.