ठाणे

मराठीच्या मुद्यावरून मनसे आक्रमक; बँक, पोस्ट कार्यालयात धडक

शहरात मराठीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Swapnil S

शहरात मराठीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ठाणे, डोंबिवली आणि उल्हासनगर येथील सहकारी, खासगी बँका आणि पोस्ट कार्यालयात जाऊन ‘मराठी भाषेचा वापर अनिवार्य करा’ असा ठाम इशारा देत आहेत. बँकांनी व्यवहार मराठीत सुरू केले नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

उल्हासनगर : व्यवहार मराठीत न झाल्यास आंदोलन

उल्हासनगरमधील विविध बँकांमध्ये मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील विविध राष्ट्रीय आणि खासगी बँकांमध्ये प्रत्यक्ष भेट देत बँकेतील व्यवहार चेकबुक, पासबुक, एटीएम सेवा, फॉर्म, सूचना फलक हे सर्व मराठीत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली. तसेच यावेळी बँकेतील बरेच सुचना फलक आणि पोस्टर हे इंग्रजी भाषेत असल्याने ते देखील फडण्यात आले. याबाबत संबंधित बँक अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन पुढील एक महिन्याची मुदतही देण्यात आली. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मनसेकडून उग्र आंदोलन छेडले जाईल. राज्याच्या बँकांमध्येच जर मराठीला स्थान नसेल, तर सामान्य मराठी माणसाच्या भावनांवर कुठे न्याय मिळणार? असा सवाल मनसैनिकांनी उपस्थित केला.

बँकांमध्ये मराठीत व्यवहार लागू न झाल्यास मनसे आंदोलनात्मक मार्ग स्वीकारणार असून त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस प्रशासनानेही याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, अशी नागरिकांची भावना आहे.

मराठीसाठी संघर्षाची नवी लाट

राजकीय दृष्टिकोनातून ही घटना मराठी भाषेच्या हक्कासाठी सुरू असलेल्या लढ्याला नवे वळण देणारी ठरू शकते. उल्हासनगरसारख्या विविध भाषिक शहरात मराठीसाठी असा आक्रमक लढा उभारण्यात आल्याने मनसेची ही भूमिका राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

बँकांची भूमिका काय?

मनसैनिकांच्या निवेदनानंतर काही बँक अधिकाऱ्यांनी याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवला असून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे संकेत दिले. मात्र यावर ठोस पावले उचलली नाहीत, तर मनसे पुन्हा रस्त्यावर उतरेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे : मराठीचा वापर करण्यासंदर्भात शासनाने दिलेल्या आदेशांची करून दिली आठवण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर मनसे सैनिक आक्रमक झालेले दिसत आहेत. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महाराष्ट्रातील बँकेतील व्यवहार तसेच महाराष्ट्रातील आस्थापना यांना मराठीचा वापर प्रामुख्याने केले पाहिजे असे सांगितल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यातील टपाल तसेच कर्नाटका बँकेमध्ये जाऊन आंदोलन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वप्नील महिंद्रकर यांनी ठाण्यातील पोखरण रोड येथील टपाल कार्यालयात धडक देऊन तेथील विभागीय प्रमुख यांना शासनाने दिलेल्या आदेशाची आठवण करून दिली तसेच स्वतःच्याच राज्यात पाहुणे बनू नका. तसेच मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी वर्तकनगर येथील कर्नाटका बँकेमध्ये जाऊन आंदोलन करत सर्व इंग्रजी बोर्ड काढायला लावले आणि पाच दिवसांत सर्व मराठीत बोर्ड व व्यवहार करावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दिनकर फुलसुंदर, दत्ता चव्हाण, मनीष सावंत, प्रकाश महाले, किशोर पाटील, संतोष कांबळे, संदीप कडू, कृष्णा देवकोटा यांच्यासह मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, उपशहरध्यक्ष पुष्कर विचारे व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

मराठी माणूस या राज्यात उपेक्षित राहणार नाही! बँका म्हणजे सामान्य जनतेचा भाग आहे. मग त्या व्यवहारांमध्ये मराठीला का वंचित ठेवायचं? हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही बँकांना ठाम इशारा दिला आहे. मराठी व्यवहार सुरू करा, नाहीतर मनसेच्या आंदोलनाची तीव्रता बघायला तयार रहा. मराठीचा अभिमान जपण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत!

- बंडू देशमुख, (मनसे जिल्हाध्यक्ष )

ठाणे शहरातील केंद्र शासन संचालित विविध आस्थापना यांच्यामध्ये मराठीचा वापर प्रामुख्याने करावा व तसे न झाल्यास मनसेच्या वतीने सदर आस्थापनांना धडा शिकवण्यात येईल.

स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहर अध्यक्ष जनहित व विधी विभाग मनसे

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल