ठाणे

ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे अज्ञान उघड; मराठी फलक प्रकरणावर मनसेचा इशारा

महाराष्ट्र शासनाच्या १४ मार्च २०२४च्या आदेशानुसार राज्यातील सर्व शाळा, संस्था व कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य आहे, पत्रव्यवहार, सूचना व फलक मराठीत असणे बंधनकारक आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला या आदेशाची माहिती नसल्याचे मनसे शहराध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी उघड केले.

Swapnil S

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या १४ मार्च २०२४ रोजी काढलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी शाळा तसेच विविध आस्थापना व कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य आहे. दैनंदिन पत्रव्यवहार, सूचना तसेच फलक मराठीत असणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट नमूद आहे.

मात्र या आदेशाबाबतच ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला अज्ञान असल्याचे धक्कादायक वास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) ठाणे शहराध्यक्ष (जनहित व विधी विभाग) स्वप्नील महिंद्रकर यांनी समोर आणले आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागाने नुकतेच सर्व शाळांना एक पत्र पाठविले. त्यात नमूद करण्यात आलेला शासन आदेश शालेय व क्रीडा विभागाचा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात तो आदेश मराठी भाषा विभागाने जारी केला असून शासनाच्या संकेतस्थळावरही त्याचा संदर्भ शालेय व क्रीडा विभागाशी संबंधित नाही, असे तपासणीतून उघड झाले. चुकीचा संदर्भ देत शाळांना पत्र देणे ही शिक्षण विभागाची बेपर्वाई आणि अज्ञानाचे लक्षण असल्याची टीका मनसेने केली.

मनसेने या प्रकरणाची तीव्र दखल घेत चुकीच्या आदेशाची पोलखोल केली आहे. इतकेच नव्हे तर ठाणे महापालिका क्षेत्रातील बहुसंख्य इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे फलक आजही इंग्रजी भाषेत असल्याचे वास्तव समोर आणले आहे. शासन आदेश असूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केला.

मराठी भाषा ही राज्याची राजभाषा असून तिचा सन्मान राखणे व वापर बंधनकारक करणे हे शासनाच्या आदेशात स्पष्ट आहे. तरीही ठाण्यासारख्या महत्त्वाच्या शहरातील शाळांमध्ये इंग्रजी फलक झळकत राहणे म्हणजे शासन आदेशाला केराची टोपली दाखविणे होय. येणाऱ्या सात दिवसांत शाळांनी फलक मराठीत केले नाहीत, तर मनसेकडून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. यासाठी सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल.
स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहराध्यक्ष मनसे

या निष्काळजी वृत्तीमुळे मराठी भाषेबाबत शासनाची धोरणे कितपत गांभीर्याने घेतली जातात, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Mumbai : वीकेंडला ट्रेनने प्रवास करताय? आधीच जाणून घ्या वेळापत्रक; उद्या 'या' मार्गावर २१ तासांचा मेगाब्लॉक

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; फ्लाइट्स कधी आणि कोणत्या मार्गांवर सुरू होणार? जाणून घ्या सविस्तर

IPLची रणधुमाळी सुरू! बंगळुरू-हैदराबाद लढतीने आजपासून १९व्या पर्वाला शानदार प्रारंभ

नवी मुंबईतून आता थेट श्रीनगर, गोवा, तिरुपती; उद्यापासून विमानसेवांचा विस्तार, तब्बल ४६ शहरांसाठी थेट सेवा

केंद्र सरकार ८.२० लाख कोटी कर्ज घेणार; महसुली तूट भरून काढण्यासाठी निर्णय