Mumbai Rain Alert : समुद्रात उंच भरतीची शक्यता; मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे सतर्कतेचा इशारा

भरतीच्या वेळेत पावसाचा जोर वाढल्यास सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Mumbai Rain Alert : समुद्रात उंच भरतीची शक्यता; मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे सतर्कतेचा इशारा
Mumbai Rain Alert : समुद्रात उंच भरतीची शक्यता; मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे सतर्कतेचा इशारा
Published on

मुंबई : मुंबईत मंगळवारी समुद्रात उंच भरतीची शक्यता असून, त्याचवेळी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भरतीच्या वेळेत पावसाचा जोर वाढल्यास सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईसाठी IMD चा ऑरेंज अलर्ट असून, शहर आणि उपनगरांमध्ये दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

आजच्या भरती-ओहोटीची वेळ

माहितीनुसार, आज (मंगळवार) दुपारी ४.३४ वाजता ३.९३ मीटर उंच भरती येणार आहे. त्यानंतर रात्री ११.०२ वाजता १.४३ मीटर ओहोटी असेल.

तर बुधवारी (८ जुलै) पहाटे ५.४३ वाजता ३.४१ मीटर उंच भरती, तर सकाळी ११.०७ वाजता २.१४ मीटर ओहोटी अपेक्षित आहे.

सखल भागांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना विशेषतः भरतीच्या वेळेत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दुपारच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्यास पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्याचा वेग कमी होऊ शकतो. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

पावसाचा जोर कमी झाला तरी धोका कायम

रात्रीच्या तुलनेत मंगळवारी सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी नागरिकांनी निष्काळजी राहू नये, असा सल्ला IMD ने दिला आहे. सक्रिय मान्सून प्रणालीमुळे शहरात अधूनमधून जोरदार सरी आणि वेगवान वारे कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

धरणसाठ्यात वाढ

दरम्यान, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील उपयुक्त जलसाठा २८.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in