मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मंगळवारी लोकल गाड्यांच्या खोळंब्यामुळे प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकाजवळील रेल्वे फाटकामुळे सकाळी ऐन गर्दीच्या वेळी उपनगरीय लोकल सेवेचा बोजवारा उडाला. तब्बल तीन वेळा फाटक बंद करता न आल्याने अप आणि डाऊन मार्गावरील नऊ लोकल रखडल्या. या लोकल जागच्या जागीच थांबल्याने विविध रेल्वे स्थानकांमध्ये गर्दी उसळली. त्यामुळे प्रवाशांना फार मोठा त्रास सहन करावा लागला.
दिवा स्थानकाजवळील रेल्वे फाटक सकाळी १०.३५, ११.१० आणि १२.११ वाजता उघडे राहिले. तिन्ही वेळा सुमारे १२ मिनिटे फाटक बंद करता आले नाही. रस्त्यावरील वाहनांची गर्दी वाढल्याने ही अडचण निर्माण झाली. त्यामुळे लोकल थांबविण्यात आल्या. एका लोकलला झालेल्या विलंबाचा परिणाम सहाजिकच त्यामागील गाड्यांवरही झाला.
फाटकामुळे लोकल रखडल्या
दिवा फाटकाजवळ लोकल थांबल्यानंतर त्यामागील गाड्यांनाही थांबावे लागले. त्यामुळे काही मिनिटांचा हा विलंब वाढतच गेला. लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची मोठी कोंडी झाली. दिवा, डोंबिवली आणि कल्याण परिसरातून सकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे लोकलला विलंब झाला की त्याचा थेट परिणाम त्यांच्या पुढील प्रवासावर होतो. मंगळवारी फाटकामुळे लोकल रखडल्याने प्रवासाचा वेळ वाढला. कार्यालयात पोहोचण्याची वेळ चुकण्याची भीती प्रवाशांना होती. काही प्रवाशांना नियोजित वेळेऐवजी पुढील लोकलची प्रतीक्षा करावी लागली.
विलंबाचा परिणाम फेऱ्यांवरही झाला
डाउन मार्गावरील सीएसएमटी-कल्याण, परळ-कल्याण, सीएसएमटी-कर्जत, सीएसएमटी-अंबरनाथ आणि ठाणे-आसनगाव या लोकल त्यामुळे प्रभावित झाल्या. अप मार्गावरील अंबरनाथ-सीएसएमटी, टिटवाळा-सीएसएमटी, बदलापूर-सीएसएमटी आणि कल्याण-सीएसएमटी या लोकलनाही विलंब झाला. गाड्या एकामागोमाग एक थांबवाव्या लागल्याने त्याचा परिणाम पुढील फेऱ्यांवरही झाला.
बिघाडामुळे लोकल भाइंदर स्थानकातच रद्द
पश्चिमी रेल्वेवर गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडामुळे लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला. विरारवरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये अचानक ब्रेक बाइंडिंगची समस्या निर्माण झाल्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाला ही लोकल भाइंदर स्थानकातच रद्द करावी लागली. यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोठे हाल झाले.
बिघाडांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप
याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, सकाळी १०.३९ विरार येथून सुटलेली चर्चगेट लोकल सकाळी ११.३० च्या सुमारास भाइंदर स्थानकाजवळ पोहोचली असता, या लोकलमध्ये ब्रेक बाइंडिंग (ब्रेक जाम होणे) झाल्याचे समोर आले. सुरक्षेचा उपाय म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही लोकल भाइंदर येथेच थांबवून रिकामी केली आणि तेथूनच ती माघारी फिरवण्यात आली. सकाळच्या गर्दीच्यावेळी हा प्रकार घडल्यामुळे भाइंदर स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होती. या तांत्रिक बिघाडामुळे पश्चिमेकडील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. तसेच, वातानुकूलित लोकलच्या दरवाजांची उघडझाप होण्यास नियमित तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे दररोजच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून लवकरात लवकर लोकलमधील बिघाड दुरुस्त करून लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली असली, तरी वारंवार होणाऱ्या अशा तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सकाळी गर्दीच्या वेळी मनस्ताप
तर, पश्चिम रेल्वेवर विरार-चर्चगेट लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती भाईंदर येथेच रद्द करावी लागली. दोन्ही मार्गांवर सकाळच्या गर्दीच्या वेळी १० ते १५ मिनिटांचा विलंब झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
दिवसाला सरासरी ३९ वेळा फाटक होते बंद
दिवा स्थानकाजवळील लेव्हल क्रॉसिंग फाटक दिवसाला सरासरी ३९ वेळा बंद होते. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा भार एकाच ठिकाणी येत असल्याने रस्त्यावरील गर्दी वाढली की फाटक बंद करण्यात अडथळा निर्माण होतो. फाटक बंद न झाल्यास सुरक्षेच्या कारणास्तव लोकल थांबवावी लागते. त्यामुळे या फाटकाचा परिणाम वारंवार रेल्वेच्या वेळापत्रकावर होत आहे.