ठाणे

शाडूच्या गणेशमूर्तींसाठी महापालिकेचा आग्रह

Swapnil S

ठाणे : भाद्रपद गणेशोत्सवाला अजून बराच अवधी असला तरी गणपतीच्या मूर्ती बनविण्याआधीच महापालिकेने गुरुवारी मूर्तिकाराची बैठक घेऊन यावर्षी घरगुती गणेशाच्या मूर्ती या शाडूच्याच बनविण्यात याव्यात. यासाठी लागणारी शाडूची माती, जागा आणि इतर सुविधा महापालिका उपलब्ध करून देईल अशी ठोस भूमिका महापालिकेने घेतली आहे. तसेच मूर्तिकारांच्या उर्वरित मागण्यांबाबतही सकारात्मक विचार करून सुवर्णमध्य काढण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नमूद केले.

ठाणे महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात दि. २२ फेब्रुवारी रोजी मूर्तिकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपायुक्त वर्षा दीक्षित, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान तसेच ठाण्यातील बहुसंख्य मूर्तिकार उपस्थित होते. शाडूमातीच्या मूर्ती या पर्यावरणपूरक असल्यामुळे यंदा घरगुती गणेशाची मूर्ती ही शाडूची असेल याची दक्षता मूर्तिकारांनी घ्यावयाची आहे. तसेच गणेशमूर्ती साठवणूक करण्यासाठी तसेच मूर्ती बनविण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेकडे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे मूर्तिकारांना शाडूची माती देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. मूर्तिकार किती मूर्ती घडविणार आहेत, किती साठा करणार आहेत याची सर्व माहिती महापालिकेस देणे बंधनकारक असणार आहे. पीओपीऐवजी पर्यावरणपूरक असलेल्या गणेशमूर्ती बनविण्याबाबतचे आवाहन देखील अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी यावेळी केले.

बाहेरच्या मूर्तिकारांवर जिल्हाबंदीची मागणी

शाडूच्या मूर्ती बनविण्यासाठी बराच कालावधी लागतो. यासाठी मूर्तिकारांना महापालिकेच्या पडिक किंवा मोकळ्या जागा १२ महिन्यांसाठी उपलब्ध करून द्याव्यात. तसेच जे अधिकृत मूर्तिकार आहेत त्यांना महापालिकेने ओळखपत्र द्यावे. बाहेरच्या मूर्तिकारांना जिल्हाबंदी करण्यात यावी. तसेच जे मूर्तिकार बाहेरून मूर्ती आणून त्याची विक्री करतात, त्यांना देखील परवानगी बंधनकारक करावी. जे मूर्तिकार शाडू मातीऐवजी पीओपीच्या मूर्ती तयार करतात त्यांच्यावर निर्बंध आणावेत. शाडूच्या मूर्तींबाबत महापालिकेने नियमावली प्रसिद्ध करावी जेणेकरून मूर्तिकारांना ती कारखान्यात लावणे बंधनकारक करावे, अशा मागण्या बैठकीस उपस्थित असलेल्या मूर्तिकारांनी केल्या.

शाडूच्या मूर्तींबाबत मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने घंटागाड्या, उद्याने, मैदाने तसेच शहरातील विविध भागात जनजागृती करणारे फलक आतापासूनच लावावेत, अशीही सूचना यावेळी मूर्तिकारांकडून करण्यात आली. सदर बैठकीत प्रशासनाकडे मूर्तिकारांनी केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून तोडगा काढला जाईल.

- मनीषा प्रधान, मुख्य पर्यावरण अधिकारी

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस