२५ एप्रिलपर्यंत मोबदला न मिळाल्यास २६ रोजी पुन्हा आक्रमक
ओंकार पातकर / शहापूर
शुक्रवारी दै. ‘नवशक्ति’मध्ये ‘समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची लगीनघाई’ या ठळक मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी फोनवर संपर्क साधला. या प्रकरणी बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, यासाठी सकारात्मक पाऊल उचलत असल्याचे सांगत येत्या २५ एप्रिलपर्यंत प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी ठिय्या आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची भेट घेत त्यांना आश्वासित करीत आंदोलनाची सांगता केली.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे १ मे राेजी उद्घाटन करण्याचे शासनाने नियोजन सुरू केले आहे. मात्र तालुक्यातील काही आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या महामार्गासाठी भूसंपादन करून झाल्यानंतर त्याचा मोबदला अजूनही न मिळाल्याने या शेतकऱ्यांनी इगतपुरी बोगदा येथे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. वाशाळा येथील देवराम सोमा भला, गट नं ४७२, कान्हू कामा सोंगाळ, मौजे फुगाळे येथील भाऊ सकृ भला, गट नं ३७, मौजे कसारा येथील जैतू कमळू घोगरे गट नं ६५, मौजे शंकर रामा शिंगे गट नं १३४७, तसेच मौजे शेलवली येथील गट नं २३३मधील शेतकरी विनोद थोरात यांच्यासहित सात शेतकऱ्यांनी या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.