ठाणे : टीडीआर घोटाळ्यामुळे वन विभागासह ठाणे महापालिकेची नाचक्की होत असतानाच आता आणखी एक वादग्रस्त प्रकरण समोर आले आहे. बाळकुम परिसरात प्रस्तावित ॲमेझॉनच्या मेगा डेटा सेंटरमुळे ठाणेकरांच्या पाणीपुरवठ्यावर, पर्यावरणावर आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने केला आहे. या प्रकल्पाला सभागृहात तसेच जनतेमध्ये जाऊन विरोध करण्यात येईल, असा इशारा पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, गटनेते अभिजीत पवार आणि महिला अध्यक्षा मनीषा भगत उपस्थित होत्या. ॲमेझॉन कंपनीने कल्पतरूकडून बाळकुम परिसरातील सुमारे ५३ एकर जागा १,८३० कोटी रुपयांना खरेदी केली असून त्यासाठी १३० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. या ठिकाणी मेगा डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. मात्र, हा प्रकल्प ठाणेकरांच्या मुळावर उठलेला राक्षस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने केला आहे.
ठाणे शहराला स्वतःचे धरण नसून मुंबई महापालिका, स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. आधीच शहराला दररोज सुमारे ३० एमएलडी पाण्याची तूट भासत असल्याची कबुली महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात दिली आहे.
अशा परिस्थितीत डेटा सेंटरमधील कुलिंग प्रक्रियेसाठी लागणारे पाणी कुठून आणले जाणार, असा सवाल उपस्थित करत ठाणे महापालिकेकडून या प्रकल्पासाठी दररोज १२ एमएलडी पाणी पुरवले जाणार असल्याचा दावा त्यांनी केला.
हा प्रकल्प ज्या भागात नागरी वस्ती नाही, अशा ठिकाणी उभारला जावा. डेटा सेंटरमधून निर्माण होणारे ध्वनिप्रदूषण इतके तीव्र असू शकते की नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. हे सर्व माहिती असूनही प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला जात असेल, तर महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच महापौर आणि उपमहापौर यांची निवासस्थानेही डेटा सेंटरच्या परिसरात उभारावीत, असा टोला त्यांनी लगावला. या प्रश्नावर येत्या अधिवेशनातही आवाज उठविणार आहे.डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार
प्रस्तावित प्रकल्पाच्या एक किलोमीटर परिसरात आठपेक्षा अधिक मोठी गृहनिर्माण संकुले, पाच शाळा आणि तीन रुग्णालये आहेत. यामध्ये प्रकल्पाच्या जागेपासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर असलेल्या एका बालरुग्णालयाचाही समावेश आहे. जगभरातील मोठी डेटा सेंटर्स ९० डेसिबलपर्यंतचा सातत्यपूर्ण आवाज निर्माण करू शकतात. इतर उद्योगांप्रमाणे हा आवाज अधूनमधून नसून २४ तास सुरू राहणारा असतो. त्यामुळे नागरिकांसह प्राणी-पक्ष्यांवरही त्याचे परिणाम होऊ शकतात.मनोज प्रधान, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस