उल्हासनगर : गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी उल्हासनगरातील बाजारपेठा आणि दुकाने नेहमीप्रमाणे सुरू राहणार असली, तरी व्यापारी यूपीआयद्वारे होणारे डिजिटल पेमेंट स्वीकारणार नाहीत. प्रस्तावित मर्चंट डिस्काऊंट रेट (एमडीआर) शुल्काला विरोध करण्यासाठी उल्हासनगरातील व्यापाऱ्यांनी २ ऑक्टोबर रोजी ‘नो यूपीआय डे’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी दुकानांमधील यूपीआय स्कॅनरवर काळे कापड टाकून निषेध नोंदवण्यात येणार आहे.
दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर प्रस्तावित ०.४ टक्के एमडीआर शुल्क आकारण्याच्या मुद्द्यावरून व्यापारी संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत उल्हासनगर शॉपकिपर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली शहरातील व्यापारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
२ ऑक्टोबर रोजी व्यापारी दुकाने नियमितपणे सुरू ठेवणार आहेत. मात्र, यूपीआयच्या माध्यमातून होणारे पेमेंट स्वीकारले जाणार नाही. निषेधाचे प्रतीक म्हणून दुकानांतील यूपीआय स्कॅनरवर काळे कापड टाकण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित एमडीआर शुल्कामुळे मोठ्या रकमेच्या डिजिटल व्यवहारांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. त्यामुळे या शुल्काचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात येत आहे.
रोख रक्कम सोबत ठेवण्याचे आवाहन
२ ऑक्टोबर रोजी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी सोबत पुरेशी रोख रक्कम ठेवावी, असे आवाहन व्यापारी संघटनेने केले आहे. तसेच थेट बँक खात्यात पैसे वर्ग करणे किंवा धनादेशाद्वारे व्यवहार करण्याचे पर्याय उपलब्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी उल्हासनगरातील बाजारपेठा सुरू राहणार असल्या तरी यूपीआय व्यवहार स्वीकारले जाणार नसल्याने ग्राहकांनी खरेदीपूर्वी पेमेंटची पर्यायी व्यवस्था करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘यूपीआयला नाही, तर एमडीआर शुल्काला विरोध’
उल्हासनगर शॉपकिपर्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी यांनी स्पष्ट केले की, व्यापाऱ्यांचा विरोध यूपीआय किंवा डिजिटल पेमेंट व्यवस्थेला नसून प्रस्तावित एमडीआर शुल्काला आहे. या शुल्कामुळे व्यापाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडेल, असा संघटनेचा दावा आहे. शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यासाठी २ ऑक्टोबरच्या आंदोलनात व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे, यूपीआय स्कॅनरवर काळे कापड टाकून निषेध नोंदवावा आणि व्यापारी एकजूट दाखवावी, असे आवाहन छतलानी यांनी केले आहे.