ठाणे

पलावा उड्डाणपुलावरून आरोप-प्रत्यारोप; कामाच्या गुणवत्तेवरून राजकीय संघर्ष

पलावा उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर अवघ्या काही तासांत तो बंद करण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Swapnil S

डोंबिवली : पलावा उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर अवघ्या काही तासांत तो बंद करण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसेने टीकेची झोड उठवली आहे, तर सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि आमदार राजेश मोरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत पूल दर्जेदार असून या पुलामुळे लोकांना दिलासा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

स्टोनक्रशरमुळे काही ठिकाणी खड्ड्यासारखे वाटले तरी प्रत्यक्षात ते खड्डे नव्हते. विरोधकांनी त्याचे फोटो घेतले आणि सोशल मीडियावर प्रसारित करून दिशाभूल केली. पुलाचे काम चांगल्या प्रकारे झाले आहे. वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. काळजीच्या दृष्टिकोनातून आम्ही तात्पुरता पूल बंद करण्यात आला होता.
राजेश मोरे, आमदार कल्याण ग्रामीण

कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे म्हणाले की, ४ जुलै रोजी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र उद्घाटनानंतर वाहतुकीदरम्यान एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. त्यामुळे काळजीच्या दृष्टिकोनातून आम्ही तात्पुरता पूल बंद करण्यात आला होता. डांबरीकरणावर ऑइल साचल्याने वाहने घसरत होती, म्हणून आम्ही तातडीने स्टोनक्रशर टाकून उपाययोजना केली. त्यानंतर सायंकाळी पुन्हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी विरोधकांकडे आता काम उरलेले नाही, म्हणून ते उगाच विरोध करत आहेत. पूल चांगला झाला असून नागरिक समाधानी आहेत. आता वाहतूककोंडीही होत नसल्याचे म्हटले आहे.

अर्धवट काम पूर्ण न करता उद्घाटन करून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला. पुलावरून अनेक लोक पडल्याने संबंधितावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. यासंदर्भात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना निवेदनही देण्यात आले आहे. हे उद्घाटन राजकीय हेतूने घाईगडबडीने करण्यात आले.
दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख उद्धव ठाकरे गट

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

नाकापेक्षा मोती जड

जीवनसाखळी संरक्षित करूया!