राज्य सरकारकडून अजूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींबाबत निर्णय झाला नसून, बनविलेल्या लाखो गणेशमूर्तींची विक्री करायची कशी? शिवाय मुंबई महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरील बंदी कायम ठेवल्याने सर्वात जास्त पेण तालुका, शहरासह ग्रामीण भागातील हमरापूर विभागातील गणेश मूर्तिकारांची मोठी कोंडी झाली आहे. प्लास्टरच्या मूर्तींबाबत संभ्रम कायम असल्याने तयार झालेल्या लाखो गणेशमूर्तींचे करायचे काय? असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या विघ्नहर्त्यावरच पीओपी बंदीचे ‘महाविघ्न’ आले आहे, त्यामुळे संपूर्ण जगाला मूर्ती पुरविणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पेणकर गणेशमूर्तीकार ‘तणावात’ दिसत आहेत.
पेण शहरासह तालुक्यातील हमरापूर, जोहे, कळवे, दादर, उंबर्डे, शिर्की, गडब व आसपासच्या परिसरात गणेशमूर्ती तयार करण्याचे काम वर्षभर सुरू असते. पेण शहर आणि हमरापूर जोहे परिसरात गणेशमूर्ती तयार करणाऱ्या पाचशेहून अधिक कार्यशाळा आहेत. ज्यामधून दरवर्षी सुमारे ३० लाख गणेशमूर्ती तयार केल्या जातात. नंतर त्या देशाविदेशात पाठवल्या जातात, दरवर्षी या व्यवसायातून ७० ते ८० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. या व्यवसायामूळे २५ हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो. राज्यात लागणाऱ्या एकूण गणेशमूर्तींपैकी जवळपास ६० टक्के गणेशमूर्ती संपूर्ण पेण तालुक्यात बनविण्यात येत असून त्या तयार केल्या जातात.
हमरापूर जोहे व पेण शहर परिसरात लाखो पीओपीच्या गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत. त्यांचे रंगकाम, गोल्डन आणि आखणी शिल्लक आहेत. मात्र कोर्टाने आदेश दिलेल्या पीओपी मूर्तीवरील बंदीमुळे आता तयार झालेल्या गणेशमूर्तींचे करायचे काय? हा गंभीर प्रश्न पेणसह राज्यातील मूर्तिकारांना भेडसावत आहे.
पीओपी गणेशमूर्तीसाठीच पेणचे मूर्तिकार आग्रही का?
पीओपीच्या गणेशमूर्ती या टिकाऊ आणि वजनाला हलक्या असतात. कमी वेळात जास्त मूर्ती तयार करणे सहजशक्य होते. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी पीओपीच्या गणेश मूर्ती उपयुक्त ठरतात. मूर्तीची सुबकता चांगली असते. किमतीलाही या मूर्ती शाडूच्या गणेशमूर्तींच्या तुलनेत अर्ध्या किमतीत म्हणजे खूप स्वस्त पडतात, मातीच्या गणेशमूर्ती या वजनाला जड, हाताळायला नाजूक आणि बनवायला अधिक परिश्रमाच्या असतात. पीओपीच्या तुलनेत शाडूची मूर्ती घडवण्यासाठी लागणारा वेळही जास्त असतो.
कोर्टाने व शासनाने पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी हटवायला हवी. आज पेण आणि हमरापूर जोहे परिसरात पीओपीच्या १० लाख कच्च्या आणि ५ लाख रंगकाम झालेल्या गणेशमूर्ती तयार आहेत. आत्ता या मूर्तींचे करायचे काय? हा प्रश्न आमच्यासमोर आला आहे. कारखानदारांनी बँकेतून कर्ज काढून या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. पीओपी मूर्तीं बंदीबाबत तातडीने निर्णय व्हायला हवा.
- कुणाल पाटील, मूर्तिकार तथा माजी अध्यक्ष, हमरापूर, ता. पेण
आपल्या राज्यात पीओपी गणेशमूर्तींवर बंदी घातली गेली. पण शेजारी असलेल्या गुजरात आणि आंध्र प्रदेशसारख्या इतर राज्यात पीओपीच्या गणेशमूर्तीवर बंदी नाही. मग पीओपीचे प्रदूषण फक्त महाराष्ट्रातच होते का? असा आमचा सवाल आहे. संपूर्ण अभ्यास करून हा बंदीबाबत निर्णय घेतला गेलेला नाही. त्यामुळे आम्ही देखील याबाबत न्यायालयात दाद मागत आहोत.
-अभय म्हात्रे, अध्यक्ष- गणेश मूर्तिकार संघटना महाराष्ट्र राज्य
पीओपी बंदीमुळे असंख्य कामगारांवर उपासमारीचे सावट पसरले आहे. पीओपीच्या मूर्ती घडविणारा मूर्तिकार दर दिवशी १००० ते १२०० रुपये कमवितो, मात्र बंदीमुळे शाडूची मूर्ती घडवावी लागल्यास मूर्तिकारास दर दिवशी फक्त ३०० ते ३५० रुपयेच मिळतील. पीओपी बंदीमुळे आम्हा तरुण गणेश मूर्तिकारांवर आत्महत्या करण्याची वेळ भविष्यात येणार आहे. आत्महत्या झाल्यास शासन व प्रशासन जबाबदार राहील.
-सुयोग मोकल, मूर्तिकार, जोहे, पेण